100 पदक; पंतप्रधान मोदींकडून खेळाडूंचे कौतूक

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंनी आशियाई खेळांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या नावावर एकूण १०० पदकं झाली आहेत. यात २५ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४० कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. त्यांच्या या यशानंतर सर्व स्तरातून खेळाडूंवर अभिनंदनांचा वर्षाव होऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.

खेळाडूंनी असामान्य असे यश आशियाई स्पर्धेमध्ये मिळवलं आहे. 100 पदकांच्या विजयामुळे सर्व भारतीय नागरिक रोमांचित झाले आहेत. भारताने इतिहास रचन्यामध्ये योगदान देणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. खेळाडूंच्या असामान्य खेळीने भारतीयांचे हृदय अभिमानाने भरले आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

१० ऑक्टोंबरला मी आपल्या आशियाई खेळात सहभागी खेळाडूंची संवाद साधणार आहे. यासाठी मी उत्सुक आहे, असं मोदी म्हणाले. चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. १० तारखेला या स्पर्धांचा समारोप होणार आहे. पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात महाराष्ट्राच्या ओजस देवतळे याने सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे यावेळी सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्हीही पदके भारतीय खेळाडूंनी नावावर केली.