पाचोरा : लोहारा येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला ग्राहक वैतागले आहेत. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित न देता अरेरावी करत ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा प्रकार येथील शाखेत होऊ लागला आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
तालुक्यातील लोहारा येथे सेंट्रल बँकेची शाखा आहे. या शाखेत परिसरातील सात ते आठ खेड्यांतील लोकांचा आर्थिक व्यवहार चालतो. तसेच शासकीय योजनेच्या निराधार योजनेसंदर्भातील बरेच खाते या शाखेत आहेत. शासकीय नियमानुसार विविध योजनेच्या लाभधारकांना खात्याशी मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार या शाखेतील लाभधारक मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी येत असतात. मात्र, लहान कामांसाठीही कर्मचारी विलंब करतात. एका दिवसांत होणाऱ्या कामांसाठी अनेकदा हेलपाटे मारायला लावत असल्याचे समोर आले आहे.
पत्रकार चंदू खरे हे 15 रोजी आपल्या आईच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना बँकेचे मॅनेजर यांनी ‘आज तुमचे काम होणार नाही, तीन दिवसांनी या’ असं सांगितले. चंदू यांनी ‘तीन दिवसांनी का यायचं ?’. मॅनेजर यांनी चंदू यांना अरेरावी करत ‘आम्ही सांगू त्याच पद्धतीने काम होईल’, असं सांगितलं. त्यामुळे यावरून येथील शाखेत कर्मचाऱ्यांचे मनमानी कारभार असल्याचे स्पष्ट होते.
मात्र, कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला ग्राहक वैतागले आहे. संबंधित मॅनेजरवर कडक कारवाई करून त्याची बदली करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. तसेच खाते धारकांशी प्रेमळ वागुन, त्यांचे काम वेळेवर करून देणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणीही होत आहे.