तरुण भारत लाईव्ह ।२० मे २०२३। उन्हाळ्यात वाढत्या तापमानासोबत आरोग्याच्या अनेक समस्या सुरू होतात. काही वेळा एसीच्या थंडाव्यात बसून राहावेसे वाटते. पण काही ना काही कारणामुळे उन्हाळ्यात दुपारी घराबाहेर पडावेच लागते. काहींना कामासाठी दुपारी घराबाहेर पडण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नसतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात डोळ्यांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांच्या बुबुळांना धोका निर्माण होतो. यामुळे डोळ्यांच्या आजाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढतात.
डोळे कोरडे पडून नयेत म्हणून ते वारंवार धुवावेत. दिवसा दर दहा मिनिटांनंतर डोळ्यांवर पाणी मारा, यानंतर डोळे घट्ट बंद करून पुन्हा उघडा. डोळ्यांची सतत उघडझाप करा, यामुळे डोळ्यातील कोरडेपणा कमी होईल. डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही आय ड्रॉप्सचाही वापर करू शकता. मॉइश्चरायझर लावतानाही ते डोळ्यांच्या भोवती चोळा, उन्हात बाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळे सतत चोळू नका.
उन्हाळ्यात डोळ्यांची आणखी एक प्रमुख समस्या जाणवते ती म्हणजे डोळ्यांच्या बुबुळांच्या पुढच्या भागात दाह निर्माण होतो. यामुळे केराटायटिस, एंडोफ्थाल्मायटिस, सेल्युलायटिस आणि स्टाय यांसारखे आजार होण्याचा धोका असतो. यात उन्हाळ्यात अनेकांना डोळे येतात. डोळे येणे हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो मानवी स्पर्शाने पसरतो. डोळे आलेल्या व्यक्तीचा टॉवेल किंवा रुमाल वापरल्यास हा आजार तुम्हालाही होतो.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. त्यासोबत आहारात बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि ई, ओमेगा-३ आणि झिंक यांसारख्या अँटिऑक्सिडंट घटकांचाही समावेश असणे गरजेचे आहे. यामुळे डोळ्यांचे गंभीर आजार रोखण्यास मदत होते. यात बाहेरचे प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
सफरचंद, गाजर हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जातात, कारण यात बीटा-कॅरोटीन आणि जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांना विविध संसर्गांपासून दूर ठेवते. याशिवाय व्हिटॅमिन सीच्या सेवनासाठी लिंबू आणि आंबट फळांचा आहारात समावेश करा. तसेच व्हिटॅमिन ई ने समृद्ध ड्रायफ्रुट्सचे सेवन करा. यामुळे तुम्ही मोतीबिंदू आणि वाढत्या वयासोबत डोळ्यांसंबंधित होणाऱ्या आजारांपासून दूर राहू शकता.
ओमेगा-३ ने समृद्ध सॅल्मन फिश हादेखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो, ज्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यात मदत होते. तसेच अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन आणि झिंक असते, जे वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांपासून दूर ठेवते, तसेच रातांधळेपणाची समस्या रोखण्यासही मदत करते.