जळगाव : जळगावात नेमके सुरु आहे तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जळगावात गुंडांचा हैदोस काही कमी होत नाहीये. कधी गावठी कट्टा बाळगून टोळ्या भिडतात तर कधी या ना त्या कारणाने जळगावात मारामारी होतायेत. तसेच अनेकदा गोळीबारदेखील केला गेलाय. असे असताना खुनाच्या रागातून गुंडांच्या एका टोळक्याने हैदोस घातल्याची घटना गुरुवारी पहाटे २:३० वाजेच्या तुकारामवाडी परिसरात घडली. तुकारामवाडी व सम्राट कॉलनीतील तीन घरांवर सशस्त्र हल्ला चढवला. लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर करत मालमत्तेचे नुकसान केले. घरात घुसून महिलांना अश्लील शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सात जणांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शारदा ठाकूर यांचा मुलगा आकाश व टिनू गोसावी यांच्यात चार ते पाच वर्षापासून सुरेश ओतारी यांच्या खुनाच्या रागातून वाद सुरू आहे. याच रागातून टिनू गोसावी आणि त्याच्या साथीदारांनी पहाटे त्यांच्या घरावर हल्ला केला. यात टोळक्याने बाविस्कर यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील महिलांना शिवीगाळ केली. घरासमोर लावलेल्या दुचाकीचे नुकसान केले. शारदा यांच्या घराच्या मागच्या गल्लीत राहणाऱ्या रुपाली विजय पवार यांच्या घरातील कुलर, वॉशिंग मशीन व पाण्याच्या टाक्या फोडल्या.
संशयितांचा सम्राट कॉलनीतही धुडगूस
संबंधितांनी तुकारामवाडीतच नाही तर सम्राट कॉलनीत राहणाऱ्या सविता भगवान महाजन यांच्या घराच्या खिडकीची काच आणि घरासमोर लावलेली दुचाकी व सायकलवर दगड व लाकडी दांडके मारून त्यांचेही नुकसान केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी स्वप्नील उर्फ गोलू धर्मराज ठाकूर, निशांत प्रताप चौधरी, अरुण उर्फ टिनू भिमराव गोसावी, मुन्ना पहेलवान, पारस सोनवणे, बेंडा अज्या, गौरव मिस्तरी यांच्यासह इतर पाच ते सहा जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राजेंद्र उगले हे करत आहेत.