सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा 13 डिसेंबर रोजी शुभारंभ : मेजर डॉ. निलेश पाटील

नंदुरबार :  दरवर्षी 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. या दिवसापासून सर्व राज्यांमध्ये आजी,माजी सैनिकांच्या कल्याणासाठी जनतेकडून निधी गोळा करण्यात येतो.  सैनिकांनी केलेल्या त्यागाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस नंदुरबार येथे सोमवार, 13 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.30

वाजता होणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात आयोजित हा कार्यक्रम जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा  पोलीस अधिक्षक पी.आर. पाटील, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे,

उपविभागीय अधिकारी मंदार पत्की (नंदुरबार), सुभाष दळवी (शहादा), जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष चौधरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील युद्ध विधवा, वीरमाता, पिता यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मागील वर्षी ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर सन्मानपत्र देवून  गौरविण्यात येणार आहे. माजी सैनिक तसेच ध्वजदिन निधी संकलनाचे कामी उत्कृष्ट कार्य केलेल्या सर्व  शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असेही आवाहन जिल्हा  सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.