बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे (Belgaum Cantonment Board) सीईओ के. आनंद (CEO K. Anand) यांनी आपल्या सरकारी बंगल्यात आत्महत्या केल्याची घटना आज, शनिवारी (ता. २५) सकाळी उघडकीस आली. राज्यातील एकमेव असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मूळचे तमिळनाडूमधील चेन्नईचे असणारे के. आनंद हे इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस अधिकारी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करत होते.
मिळालेल्या महितीनुसार, के. आनंद हे गुरुवारी सायंकाळपासून घरातच होते. शनिवारी सकाळी घरचा दरवाजा उघडला नाही, त्यामुळे याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा खोलला असता घरामध्ये के. आनंद यांचे शव मिळाले आहे. गत आठवडाभरापासून बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डात केंद्रीय तपास यंत्रणेकडून (सीबीआय) चौकशी सुरु होती. बोर्डाच्या भरती प्रक्रियेत घोटाळा केला असल्याचा आरोप झाला होता. ही चौकशी सुरु असतानाच बोर्डाच्या मुख्य अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती आनंद यांच्या तमिळनाडूमधील कुटुंबीयांना देण्यात आली आहे. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे ब्रिगेडियर बोर्डाचे अध्यक्ष जॉयदीप मुखर्जी, डीसीपी रोहन जगदीश आणि खडेबाजार पोलीस एसीपी अरुकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांनी, तपासणी सुरु असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं सांगितलं. दरम्यान, या घटनेने बोर्डात खळबळ माजली आहे.