गोद्री : अ.भा. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ २०२३ गोद्री येथे २५ ते ३० जानेवारी दरम्यान होत आहे. या कुंभला सुरवात होत असून २४ जानेवारी रोजी संतांची शोभा यात्रा कुंभस्थळ ते धर्मस्थळा पर्यंत काढण्यात आली. या शोभा यात्रेत ३० हजारांच्या आसपास नागरिक सहभागी झाले होते.
२३ रोजी गोद्री व आसपास च्या ६ ते ७ किमी परिसरातील गावात बंजारा समाजाच्या संतांचे आगमन झाले. २४ रोजी सकाळी सवाद्य मिरवणूक काढून त्यांचे कुंभस्थळी आगमन झाले. येथे अश्व असलेल्या ११ रथामध्ये मान्यवर संतांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीच्या अग्रस्थानी सजवलेल्या वाहनामध्ये मध्ये प.पू.संत श्री धोंडीरामबाबा, प.पू.आचार्य श्री. चंद्रबाबा महाराज यांच्या मूर्ती विराजमान होत्या. या वाहनामागे संतांचे रथ व त्यामागे संतांचे अनुयायी असलेले १० ट्रक्टर होते. या प्रसंगी पाच बँड, नाशिक येथील २ ढोल पथकासह शोभा यात्रा कुंभस्थळाहून धर्मस्थळाकडे १२.३० वा. च्या सुमारास रवाना झाली.
या शोभायात्रेवर हेलिकॉप्टरद्वारे कुंभस्थळाजवळ आणि शोभायात्रा मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सकाळ पासूनच कुंभस्थळी समाज बांधवांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. महिलांनी पारंपारिक वेशभूषेत “लेंगी“ नृत्य केले. यात लहान मुली पासून ज्येष्ठ महिलेपर्यंतचा समावेश होता. या सोबतच महिलांनी पारंपारिक पोषाखात व पारंपारिक “लोक गीते“ गात तिज आणले. कुंभ स्थळी महिला गटा गटाने पारंपारिक लोकगीते गात पारंपारिक नृत्य करत होत्या.
शोभा यात्रेत्तील आकर्षण
युवकांसह नागरिकांनी “हा मै हिंदू हू“, “हा म हिंदू छु“ असे लिहिलेल्या टोप्या परिधान केलेल्या होत्या.
शोभायात्रे दरम्यान स्त्री – पुरुषांनी वाद्यावर नृत्य केले. नागरिकांनी रथातील संताचे दर्शन घेतले. शोभा यात्रेच्या मार्गावर नागरिक दुतर्फ उभे राहून पुष्पवृष्टी करत होते. गोद्री गावात रस्याच्या दुर्तफा रांगोळ्या काढलेल्या होत्या. शोभा यात्रेच्या सुरवातीला काही महिला डोक्यावर कळस व तिज घेऊन सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत ५ डबे असलेली रेल्वेगाडी सहभागी झाली होती. या शोभायात्रेवर हेलिकॉप्टर द्वारे पुष्प वृष्टी करण्यात आली युवकांनी बंजारा समाजाचा श्वेतध्वज आणि हिंदू धर्माचा भगवा ध्वज हाती घेतले होते व ‘जय सेवालाल’ व ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देण्यात आल्या.
दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १०.३० पर्यंत पल्ला, १०.३० ते ११.३० पर्यंत मूर्ती स्थापना, दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत संत प्रवचन , संत सेवालाल महाराज अमृतलीला, सायंकाळी ७ ते १० देवी भागवत, कृष्णलीला, रामनाव संत रामराव बापू अमृतवाणी आदी कार्यक्रम होतील.
कार्यक्रम स्वरूप दि.25 जानेवारी 2023
स्वागत भाषण : मा.शरदराव ढोले अ. भा. धर्म जागरण प्रमुख
प्रास्ताविक : पू गोपाल चैतन्यजी बाबा
आशीर्वचन : पू. बाबूसिंगजी महाराज
आशीर्वचन : पू. सुरेशजी महाराज
पू. महंत विश्वेश्वरानंदजी नारायण मठ, सुरत
पू. बाबा हरनामसिंगजी
सत्र समापन : पू. गुरुशरनानंदजी महाराज
गोद्री च्या आसपास असलेले पिंपळगाव, शेवगा,रवळा, जामठी ,पठार तांडा ,गोद्री ,गोद्री सुकानाईक तांडा ,फत्तेपुर या प्रत्येक गावात 23 रोजी काही संतांचे आगमन झाले होते. याच संतांची शोभा यात्रा काढण्यात आली. अग्रस्थानी प.पू. बाबूसिंग महाराज यांचा रथ होता. त्यासोबत पूज्य गोपाल चैतन्य महाराज , पूज्य दिव्य चैतन्य महाराज , पूज्य हरी शरणांनंदन महाराज , पूज्य सर्व चैतन्य महाराज , राधे चैतन्य महाराज आदी संत ११ रथामध्ये विराजमान होते. ११ रथामध्ये २५ पेक्षा अधिक संत होते.
कुंभ साठी 23 पासूनच भाविकांचे आगमन
गोद्री कुंभ २५ जानेवारीपासून सुरु होत आहे. पण महाराष्ट्रसह व अन्य सात राज्यातून समाजबांधवाचे व स्थानिक नागरिकांचे 23 जानेवारीच्या दुपार पासूनच आगमन सुरु झाले आहे. बंजारा समाज भगिनी लोकगीते गात कुंभ स्थळी येत होत्या.