बेघर मुलांचा कैवारी

बेघर मुलांच्या जीवन संवर्धनासाठी झटणारे सदाशिव चव्हाण या सहृदयी असामीच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा हा लेख…

स्वातंत्र्यानंतर आजही बेघर मुलांच्या आयुष्याचा प्रश्न हा सुटलेला नाही. तेव्हा अशा मुलांच्या आयुष्याला अर्थ मिळावा, या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘जीवन संवर्धन फाऊंडेशन‘च्या माध्यमातून गेले, एक तप झटणाऱे सदाशिव धुडकू चव्हाण हे जणू बेघर मुलांचे कैवारी बनले आहेत. दि. १ जून १९७४ साली जन्मलेले सदाशिव चव्हाण बालपणापासूनच रा.स्व. संघाच्या शाखेवर स्वयंसेवक होते. त्यांचे वडील संत गाडगेबाबांचे शिष्य व कीर्तनकार असल्यामुळे त्यांच्या मनावर बिंबवले गेलेले समाजप्रबोधन त्यांच्या अंगवळणीच पडले. त्यामुळे उमलत्या वयात त्यांना समाजसेवेचे बाळकडू मिळाले आणि आपणही समाजाचे देणे लागतो, ही धारणा वाढत गेली.

सदाशिव यांचे प्राथमिक शिक्षण हे धुळे जिल्ह्यातील मालपूर या जन्मगावी झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी दोंडाईचा गाठून बी.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आळंदी येथे ‘वारकरी शिक्षण संस्थे‘त कीर्तनाचे प्रशिक्षण घेतल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना संत साहित्याचा व्यासंग जडला आहे. याच काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आल्यामुळे विद्यार्थी चळवळीत काम करताना देशासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे नंदुरबार येथे ‘एम.ए’ करताना अभाविपमध्ये झोकून देत काम करता आले. इथूनच परिषदेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी महाराष्ट्रातल्या अहमदनगर, सांगली, सातारा, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या ठिकाणी जाता आले.

विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम थांबवल्यानंतर ते मुंबईमध्ये नोकरीसाठी आले. त्यावेळेस मुंबईमधील बेघर मुलांच्या आयुष्यासंबंधी माहिती मिळाली. ती प्रत्यक्षात बघताना मात्र अस्वस्थता वाढायला लागली. याच तळमळीतून २०१० साली ‘जीवन संवर्धन फाऊंडेशन‘ ही बेघर मुलांसाठी काम करणारी संस्था सुरू केली. ‘जीवन संवर्धन फाऊंडेशन‘ने मुंबईतील फूटपाथ व प्लॅटफॉर्मवरील (बेघर) मुलांसाठी काम सुरू केले. या मुलांचे सर्वेक्षण करणे, या मुलांचे निरीक्षण करणे, त्याच्याशी मैत्री करणे, त्यांना बाहेरच्या जगातील चांगल्या गोष्टींची जाणीव करून देणे, त्यांना शिक्षणासाठी तयार करून योग्य ठिकाणी शिक्षणासाठी पाठवून त्यांना चांगला माणूस बनण्यास मदत करण्याचा विडा उचलला. ‘मी पण शिकणारच’ या प्रकल्पातून आज अनेक मुलांचे आयुष्य उभे राहत आहे. आतापर्यंत संस्थेने मुंबईतील १७१ मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचे कार्य केले आहे.

मुंबईत बेघर मुलांचा समाजातील अराजकतत्व गैरफायदा घेत असतात. काही जणांचे, तर लैंगिक शोषण केले जात असल्याचे ते सांगतात. ‘जीवन संवर्धन फाऊंडेशन‘च्या माध्यमातून गुरुकुल म्हस्कळ-टिटवाळा व मातृछाया गुरुकल वाघबीळ-ठाणे येथे सेवा प्रकल्प राबविले जातात. या ठिकाणी मुलामुलींच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आरोग्य संस्कार आदी गोष्टींची पूर्तता करण्यात येते. दरवर्षी नवीन मुलांच्या सर्वेचे काम जानेवारी महिन्यापासून सुरू होते. साधारणतः १०० नवीन मुले ‘मी पण शिकणारच’ या प्रकल्पात सहभागी करण्यात येतात. या मुलांना शाळेची आवड लागावी, म्हणून ‘मनः संतुलन’ वर्गाचेही आयोजन केले जाते. बेघर मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबईतील बंद पडलेल्या महापालिका शाळांमध्ये फुटपाथवर, रस्त्यावर राहणार्‍या मुलांसाठी वसतिगृह व शिक्षणाची व्यवस्था केली, तर भविष्यामध्ये मुंबईमध्ये बेघर मुले राहणार नाहीत, असेही सदाशिव सांगतात.

सदाशिव चव्हाण यांना नुकताच २०२३चा ’रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चा ’अंत्योदय’ पुरस्कार मिळाला आहे. या व्यतिरिक्त ठाणे जनता सहकारी बँकेचा ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार २०२२’ मिळाला आहे. २०२१ मध्ये ‘सेवादीप अवॉर्ड’देखील ’जीवन संवर्धन फाऊंडेशन‘ला मिळाला आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील नामांकित असे तब्बल ११ पुरस्कार संस्थेला मिळाले आहेत. ’जीवन संवर्धन फाऊंडेशन‘च्या माध्यमातून भविष्यात मुंबईतील १ हजार, ५०० बेघर मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत व त्यासाठी सर्व प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘एम.ए’, ‘बी.एड’ केलेले सदाशिव चव्हाण हे सध्या कल्याण येथे वास्तव्यास असून आई, सासूबाई, पत्नी व मुलगी असा त्यांचा परिवार आहे. समाजसेवेचा वसा घेऊन त्यांची वाटचाल सुरू असून, “नवीन पिढीनेही आपापल्या परिसरात ज्या सामाजिक समस्या आहेत, त्यांचा अभ्यास करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” असा संदेश ते या माध्यमातून उदयोन्मुख पिढीला देतात.

आज अनेक संस्था बेघर मुलांसाठी काम करीत आहेत. परंतु, अशी मुले जर कोणाला आढळली, तर त्या मुलांना योग्य ठिकाणी नेण्याचे काम समाजाने देखील केले पाहिजे, तरच या मुलांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळेल. आपण काही करू शकलो नाही, तरी किमान आपण एका तरी बेघर मुलाचे जीवन सार्थकी लावण्याचा प्रयत्न केला पाहीजे, ही भावनाच मनाला सुखावणारी असते. यासाठी गरज आहे, ती डोळसपणे समाजाकडे व आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांकडे दूरदृष्टीने पाहण्याची..अशी अपेक्षा व्यक्त करणार्‍या सहृदयी सदाशिव चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘तरुण भारत’च्या शुभेच्छा!