मुंबई : राज्यातील आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांना वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून मोठा दिलासा दिला आहे. आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून वित्तमंत्र्यांनी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
फडणवीस म्हणाले की, राज्यात सध्या सुमारे ८१ हजार आशा स्वयंसेविका तर साडेतीन हजार गटप्रवर्तक महिला कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांचे सध्याचे मानधन हे ३ हजार ५०० रुपये आहे. तर गटप्रवर्तकांचे सध्याचे मानधन हे ४ हजार ७०० रुपये एवढे आहे. या मानधनात १५०० रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे.
तसेच अंगणवाडी सेविकांचं मानधन हे ८ हजार ३२५ वरून १० हजार रुपये एवढे करण्यात येत आहे. तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार ९७५ वरून ७ हजार २०० रुपये करण्यात येत आहे. तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन हे ४४२५ वरून ५५०० रुपये करण्यात आले आहे, अशी माहिती वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली.
तसेच अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २० हजार पदे भरणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याबरोबरच अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली निर्माण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.