Maharashtra Politics : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे काँग्रेसचे एक एक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील काँग्रेसला रामराम केला आहे. राजूरकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. आता या राजकीय घडामोडीदरम्यान राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
वाचा कोण काय म्हणालं ?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी तर हे तुमच्याकडून ऐकलं आहे. मी एवढचं सांगेन की, काँग्रेसमधले अनेक नेते हे भाजपच्या संपर्कात आहेत, गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय’, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आता मी बघतोय, निवडणूक आयोगाने शिवसेना, राष्ट्रवादी चोरांच्या हातात दिली, आता काँग्रेससुद्धा अशोकरावांच्या हातात देतात का ते बघूयात कारण हे काहीही करू शकतात.
संजय राऊत म्हणाले की, अशोक चव्हाण जे काही आहेत ते काँग्रेसमुळे आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस पक्षानं नेत्यांना खूप काही दिलं आहे. मात्र, आज हेच नेते काँग्रेस पक्षाला, काँग्रेसच्या विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘चव्हाण यांनी कुठल्या कारणासाठी राजीनामा दिला याची अद्याप आम्हाला माहिती नाही. पण काँग्रेसमध्ये प्रचंड धुसफूस आहे, अस्वस्थता आहे, असं म्हटलं आहे.