पालघर : शिवसेना (शिंदे गटाचे) डहाणू तालुका विधानसभा संघटक अशोक धोडी हे मागील 12 दिवसांपासून बेपत्ता आहेत. दरम्यान, पालघर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेताना गुजरातमधील भिलाड जवळ एका बंद दगड खाणीतून धोडी यांच्या कारचा शोध घेतला आहे. या कारमध्ये एक मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलीस आणि गोताखोरांच्या मदतीने पाण्याखाली बंद झालेल्या कारला बाहेर काढण्यात आले आहे. हायड्रासह आणि गोताखोरांच्या मदतीने केलेल्या शोधात कारच्या आत एक काळं जॅकेट आणि पांढरा हेडफोन सापडला. यामुळे, या मृतदेहाचं डॅन्युमेंटेशन करण्याच्या प्रक्रियेने सध्याच्या तपासाला आणखी गती दिली आहे.
पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करून घटनास्थळी ताबडतोब तपास सुरू केला आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील स्वतः या तपासावर लक्ष ठेवून आहेत.
हेही वाचा : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपासून अत्याचार; बाळाला दिला जन्म
पालकमंत्री गणेश नाईक यांचा खुलासा
दरम्यान, या प्रकरणावर पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी थेट कुटुंबीयांची भेट घेतली आणि या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी म्हटले की, “या प्रकरणावर माझं बारीक लक्ष आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल.”
पोलिसांचे तपास यंत्रणा यापुढे या प्रकरणातील अधिक तपशील उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि संभाव्य गुन्हेगारांना पकडण्यासाठी विविध पावले उचलण्यात येत आहेत. पालघर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वाढवला असून त्याच्या अनुषंगाने सखोल तपासणी सुरू आहे.