आशिया चषक 2023 : आजपासून Super 4 चा थरार

दिल्ली : आशिया चषक 2023 स्पर्धेतील साखळी सामने पार पडले असून स्पर्धा सुपर- 4 फेरीपर्यंत पोहोचली आहे. सहा संघांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेतील प्रत्येक गटातील अव्वल 2 संघच या फेरीत प्रवेश करणार होते. अ गटातून आधीच पाकिस्तान आणि भारत संघांनी जागा बनवली आहे. तसेच, बांगलादेशही सुपर-4 फेरीत पोहोचला होता. अशात आता मंगळवारी (दि. 05 सप्टेंबर) श्रीलंकेने अफगाणिस्तानला 2 धावांनी पराभूत करताच श्रीलंका सुपर- 4 फेरीत पोहोचणारा चौथा संघ बनला. यासोबतच सुपर- 4 फेरीचे वेळापत्रकही समोर आले आहे.

सुपर 4 मधील पहिला सामना आज बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात रंगणार आहे. सुपर-4 स्टेजमध्ये एकूण 6 सामने खेळवले जातील. यानंतर गुणतालिकेतील टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. सुपर-4 स्टेजमध्ये 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. याआधी 2 सप्टेंबर रोजी दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ समोरासमोर आले होते, परंतु पावसामुळे तो सामना रद्द झाला होता. परिणामी दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला होता.

सुपर-4 चे सामने कधी आणि कुठे होणार?

6 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – लाहोर

9 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – कोलंबो
10 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध भारत – कोलंबो
12 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
14 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – कोलंबो
15 सप्टेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश – कोलंबो
17 सप्टेंबर – अंतिम सामना – कोलंबो.