---Advertisement---
Asia Cup 2025 : पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या टी-२० आशिया चषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा आज मंगळवारी होणार आहे. यात कुणा-कुणाची निवड होईल, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
सप्टेंबर ९ ते २८ दरम्यान होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी, भारतीय क्रिकेटकडे सध्या किमान ३० दर्जेदार टी-२० खेळाडू सज्ज आहेत. एका स्थानासाठी तीन ते चार पर्याय निवडकर्त्यांसमोर असून, फलंदाजीमध्ये अव्वल तीन क्रमांकांवर खेळू शकणारे सहा खेळाडू आहेत.
या क्रमांकासाठी अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा यांची कामगिरी प्रभावी ठरली असली तरी गिल, यशस्वी जैस्वाल व साई सुदर्शन यांना कमी लेखणे शक्य नाही. जर भारतीय संघात गिलचा समावेश करण्यात आला, तर सॅमसन, अभिषेक किंवा तिलक यांच्यात एखाद्याला जागा गमवावी लागू शकते. तसेच याचा फटका रिंकू सिंगलाही बसू शकतो. कारण, त्याने गेल्या काही सामन्यांत विशेष कामगिरी केलेली नाही.
फिरकी विभागात कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांच्यात स्पर्धा आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर अष्टपैलू खेळाडूंना अधिक प्राधान्य देत असल्याने वॉशिंग्टन सुंदरलाही संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.
अनुभवी युड़ावेंद्र चहलला मात्र बऱ्याच काळापासून दुर्लक्षित केले जात आहे. संघात केवळ १५ खेळाडूंचीच निवड होणार असल्याने समतोल संघ निवडणे अवघड जाणार आहे.