Asia Cup Floorball : नंदुरबारचा राजेश माळी करणार भारताचे प्रतिनिधित्व

नंदुरबार : एशिया कपसाठी राजेश माळी हा आंतरराष्ट्रीय फ्लॉवरबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल संघटनेच्या वतीने एशियाई कप सिंगापूर या देशात 6 ते 12 जुलै 2024 दरम्यान होत असलेल्या एशियाई फ्लोअरबॉल स्पर्धेकरता भारतातील दहा खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेत सार्वजनिक शिक्षण समिती संचलित श्रीमती हिरीबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू राजेश प्रकाश माळी याची निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल शाळेची चेअरमन ॲड.रमणभाई शाह, सचिव डॉ.योगेश देसाई, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक जगदीश पाटील, पर्यवेक्षिका सीमा पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रशांत बागुल व क्रीडा विभागाचे प्रमुख भिकू त्रिवेदी यांनी या खेळाडूला शुभेच्छा व अभिनंदन केले. राजेश माळी याची एशियाई फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धेसाठी रोहतक हरियाणा, चेन्नई, दिल्ली व ग्वालिहर येथे घेण्यात आलेल्या शिबिरातून भारतीय संघात निवड करण्यात आली.

नंदुरबार सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात जागतिक स्तरावर होणाऱ्या एशियाई फ्लोअरबॉल स्पर्धेत सहभाग नोंदविणारा राजेश माळी हा जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरला आहे. या यशस्वी खेळाडू विद्यार्थ्याला क्रीडाशिक्षक जगदीश वंजारी, मनीष सनेर, हेमचंद्र मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.

सदर विद्यार्थ्याचे सर्व परिसरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. शाळेतील सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. राजेश हा खेळाडू एक भाजीपाला विक्रेता प्रकाश माळी यांचा चिरंजीव आहे. नेहरू पुतळा येथे हातलॉरी लावतात.