अम्मच : जॉर्डनची राजधानी अम्मान येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गट आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतीय कुस्तीगीरांनी उकृष्ट प्रदर्शन केले. पुनरागमन करणारा दीपक पुनिया व उदितने सुवर्णपदकाच्या फेरीत प्रवेश मिळविला, तर दिनेश व मुकुल दहिया कांस्यपदकासाठी लढणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवू न शकलेल्या २५ वर्षीय पुनियाने ९२ किलो वजनी गटात बेकझत राखिमोव्हविरुद्धच्या कठीण लढतीने पुनरागमनाची सुरुवात केली. त्याला त्याच्या किर्गिस्तानच्या प्रतिस्पर्ध्याकडून कठोर प्रतिकाराचा सामना करावा लागला परंतु या चुरशीच्या उपांत्यपूर्व लढतीत त्याने १२-७ असा विजय मिळवला. दीपकने जपानचा ताकाशी इशिगुराला ८-१ असा सहज मात दिली.
आता सुवर्णपदकाच्या लढतीत त्याचा सामना इराणच्या अमीरहोसेन बी फिरोजपौरबंदपेईशी होईल. दीपकने मागील आवृत्त्यांमध्ये चार आशियाई पदके जिंकली आहेत. तो २०२१ (अल्माटी) व २०२२ (उलानबाटार) मध्ये अंतिम फेरीत पराभूत झाला आणि २०१९ आणि २०२० मध्ये कांस्यपदक जिंकले. उदितने पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठून देशाला सुवर्णपदकाच्या शर्यतीत ठेवले.
त्याने किर्गिस्तानच्या बेकबोलोट मिरझांझर उलूविरुद्ध ९-६ असा विजय मिळवत चीनच्या वानहाओ झूचा २-० असा पराभव केला. उदितला गत वर्षी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. हेवीवेट १२५ किलो गटात भाग घेत दिनेशने उपांत्यपूव लढतीत चीनच्या बुहीरदुनला तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर पराभूत केले, परंतु मंगोलियन लखाग्वागेरेल मुन्ख्तुरने उपांत्य फेरीत त्याच्यावर ५-१ ने मात केली.