तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव: बँकेचा ३५ लाखांचा बोजा न दाखवता नाशिक येथील प्लॉट विक्री करण्याचे आमिष दाखवून नात्यातील इसमानेच जळगावातील तरुणाची १० लाख ७५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात अविनाश तुकाराम येवले (राजश्री एम्पायर, अभियंता नगर, कामटवाडा, नाशिक) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे नात्यातील व्यक्तीनेच हा गंडा घातला आहे.
शहरातील मानराज पार्कजवळील विद्या नगरातील निशिगंधा अपार्टमेंटमध्ये सचिन चंद्रकांत शिरुडे हे वास्तव्यास आहेत. ते औषधींचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत. त्यांचे मामा राजेंद्र येवले यांचे साडू अविनाश तुकाराम येवले (राजश्री एम्पायर, अभियंता नगर, कामटवाडा, नाशिक) यांच्याशी पूर्वी जवळचे संबंध होते. मे २०१७ मध्ये अविनाश येवले यांनी नाशिक येथील त्यांच्या मालकीचा प्लॉट भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने खरेदी करण्यासाठी गळ घातली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून ३० मे २०१७ मध्ये सचिन शिरुडे हे त्यांच्या वडिलांसोबत नाशिक येथे गेले होते.
प्लॉट बघितल्यानंतर सचिन शिरुडे जळगाव तहसील कार्यालयाजवळ आले होते. यावेळी अविनाश येवले यांनी सांगितले की, हा प्लॉट बोजाविरहीत व बिनाजोखमीचा असल्याचे सांगत विश्वास दिल्याने ११ लाख ११ हजारात या प्लॉटचा सौदा ठरला. ११ हजार बयाना रक्कम देण्यात आली व प्लॉटच्या खरेदीसाठी उर्वरित पैसे वेळोवेळी सचिन शिरुडे यांनी आपल्या बँक खात्यातून अविनाश येवले यांच्या खात्यावर सुमारे नऊ लाख ४८ हजार रुपये तर त्यांच्या पत्नीच्या खात्यावरुन एक लाख २७ हजार असे एकूण १० लाख ७५ हजार रुपये पाठविले.
पैसे पाठविल्यानंतर शिरुडे यांनी प्लॉट खरेदी करून देण्यासाठी तगादा लावूनदेखील अविनाश येवले यांनी प्लॉट खरेदी करुन दिला नाही. अविनाश येवले हे प्लॉट खरेदी करून देण्यास टाळाटाळ करीत होते. यावेळी सचिन शिरुडे यांना व्यवहारातील प्लॉटवर येवले यांनी ९ नोव्हेंबर २०१७ रोजी बँकेचा ३५ लाखांचा बोजा आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन शिरुडे यांनी शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.