मुंबई : इर्शाळवाडीतील लोकांची आम्ही कंटेनरमध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्या संडास, बाथरूमची व्यवस्था केली. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही भूखंड पाहिला. मात्र, काही लोक इर्शाळवाडीत व्हॅनिटी व्हॅनने आले, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
राज्यातील पूरस्थितीवर आज विधानसभेत चर्चा झाली. शेतकऱ्यांना आणि नैसर्गिक आपत्तीत नुकसान ओढवलेल्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली.
पूरस्थितीवर बोलता बोलता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडी दरड दुर्घटनेला हात घातला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. आम्ही चिखल तुडवत इर्शाळवाडीत गेलो. तर काही लोक तिकडे व्हॅनिटी व्हॅन घेऊन आले होते, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.