Assembly Election 2024 । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. त्यामुळे ज्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती त्यांची ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाल्याने अर्ज दाखल करण्यासाठी एकच तारांबळ उडाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन उमेदवारांविरोधात हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले. विशेषतः हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवण्याची वेळ ही महिल्यांदाचं आली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांना तर देवळालीमधून सरोज अहिरे यांना मैदानात उतरवले आहे. दरम्यान, नरहरी झिरवळ आणि सरोज अहिरे यांच्याविरोधात उमेदवार देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले.
शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या क्षणी शिवसेनेने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.
नांदगावमध्ये समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद रंगत असताना नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपण्याच्या एक तास अगोदर एबी घेऊन नाशिकमध्ये पोहोचले. दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले आणि देवळालीच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांच्यासाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवण्यात आले.