जळगाव : राज्यात विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा क्षेत्रातही उमेदवारीसाठी इच्छुकांची चढाओढ सुरू झाली असून रस्तोरस्ती बॅनरबाजीला रंग चढला आहे. एकंदर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रात दुरंगीऐवजी बहुरंगी लढती चुरशीच्या होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकसभेच्या निवडणुका वेळेत पार पडल्या. त्यापूर्वी राज्यात २०२२ मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी पक्षांमध्ये फुटीमुळे चार प्रमुख पक्षांऐवजी आता सहा राजकीय पक्ष राजकीय पटलावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट मर्यादित असले तरी भाजप, शिवसेना ‘शिंदे गट’, राष्ट्रवादी ‘अजित पवार’ तर शिवसेना ‘उबाठा गट’, राष्ट्रवादी ‘शरदचंद्र पवार गट’ आणि काँग्रेस महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन विकास आघाडी, समाजवादी असे विविध पक्ष लोकसभा निवडणुकीत लढले. यात तिसऱ्या वेळेस भाजपाने सत्ता राखली परंतु विरोधी पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याने विरोधी पक्षाला आसमान ठेंगणे झाले आहे. यामुळे जिल्ह्यात ११ मतदारसंघात सर्वच ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीत आगामी विधानसभेसाठी उमेदवारीसाठी चढाओढ लागलेली दिसून येत आहे.
जिल्ह्यात भुसावळ, चोपडा “अनुसूचित जाती राखीव” या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. भाजप जिल्हाव्यापी असून जळगाव शहर, जामनेर, भुसावळ, चाळीसगाव या ठिकाणी पकड आहे. तर जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल, मुक्ताईनगर आणि चोपडा या ठिकाणी शिवसेना ‘शिंदे गटा’च्या ताब्यात आहेत. अमळनेरवर अजित पवार गट राष्ट्रवादी तर रावेर-यावल काँग्रेस अशा प्रत्येकी एक ठिकाणी आहे.
लोकसभाप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडी अशाच लढती जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघात रंगणार असून या लढतीचा तिसरा कोन वंचित आघाडी पर्याय असू शकतो, असा सध्याचा रागरंग आहे. परंतु लोकसभेला मिळालेल्या यशामुळे काँग्रेसला स्फूरण चढले असून जळगाव, पाचोरा, यावल, आदी ठिकाणी महाविकास आघाडीला जागा सोडावी अशी मागणी करण्याची शक्यता आहे.
जळगाव – जळगाव शहर मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून आमदार सुरेश भोळे दोन वेळा निवडून आलेले आहेत. यावर्षी उबाठा गटाचेदेखील माजी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह शिंदे गटाकडूनदेखील प्रबळ उमेदवाराचा दावा केला जात आहे.
जळगाव ग्रामीण – जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव तालुका व धरणाव तालुका समावेश असून आमदार तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे वर्चस्व आहे. या गटात शिंदे गट शिवसेनाचा दबदबा असून तेथे भाजपाचा फुटीर गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे गुलाबराव देवकर यांच्यासह उबाठा गटाकडून धरणगाव तालुक्यातून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत.
पाचोरा- पाचोरा-भडगाव मतदारसंघ २००९-१४ चा अपवाद वगळता चार पंचवार्षिक पासून शिवसेनेचा पारंपारीक गड आहे. या मतदारसंघात भाजपाचे प्राबल्य ग्रामीण भागात असून गेल्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर उमेदवार यांचा निसटता पराभव झाला होता. जिल्ह्यासह राज्यात महायुती असली तरी यावेळी मात्र पाचोरा विधानसभा क्षेत्रात चित्र वेगळे असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी तर विद्यमान आमदार यांना सरळसरळ आव्हान दिले आहे. उबाठा गटाच्या वैशाली सूर्यवंशी, काँग्रेसचे सचिन सोमवंशी, भाजपचे अमोल शिंदे आणि मनसेचे अनिल वाघ यांच्याकडून उघडउघड उमेदवारीसंदर्भात दावा केला जात आहे.
मुक्ताईनगर – मुक्ताईनगरमधून विद्यमान आमदार चंद्रकात पाटील हे तत्कालीन शिवसेना महाविकास आघाडी गटाकडून तसेच राष्ट्रवादीच्या पाठींब्याने अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी सध्या शिंदे गटात त्यांचा दबदबा आहे. आमदार एकनाथराव खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे खेवलकर या शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारीच्या प्रबल दावेदार आहेत.
यावल-रावेर – यावल-रावेर विधानसभा क्षेत्र पारंपारीकरित्या भाजपाची पकड असली तरी विद्यमान एकमेव काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचे पूत्र विधानसभेसाठी दावा सांगू शकतात. तर मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून अनिल चौधरी यांची देखील दावेदारी आहे.
चाळीसगाव विधानसभा
मतदारसंघात कृषी उत्पन्न बाजार समितीसह भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची मजबूत पकड असली तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा दबदबा बऱ्यापैकी आहे. यात माजी आमदार राजीव देशमुख, दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, भाजपमधून उबाठा गटाकडे गेलेले माजी खासदार उन्मेष पाटील आदीकडून विधानसभेसाठी उमेदवारीचा दावा केला जाऊ शकतो.
जामनेर- जामनेर मतदारसंघात मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यासमोर असलेले आव्हान अगोदरच शमवले असून त्यांना भाजपात सामावून घेतले आहे. तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सोपान पाटील हे आव्हान देऊ शकतात.
चोपडा राखीव मतदारसंघात माजी आमदार अरूणभाई गुजराथी यांचे वारसदार तयार नसल्याचे चित्र असून माजी आमदार प्रा. चंद्रकात सोनवणे व विद्यमान आमदार लता सोनवणे यांना सध्यातरी मात्र कोणीही प्रतिस्पर्धी उमेदवार नाही असे चित्र आहे.
भुसावळ राखीव मतदारसंघात आमदार संजय सावकारे हे दोन नव्हे तर तीन वेळा निवडून आले आहेत. त्यांची मतदारसंघावर पकड असून त्यांना यावेळी शरदचंद्र पवार गटाकडून माजी आमदार संतोष चौधरी, जगन सोनवणे यांच्याकडून प्रतिस्पर्धी म्हणून आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.
अमळनेरमधून मिळते एकदाच संधी
पारोळा मतदार संघातील मतदार डॉ. सतीश पाटील व आमदार चिमणराव पाटील यांना दरवेळेस आलटून पालटून आमदारकिची संधी देत असतात. यावेळी देखील आमदार चिमणराव पाटील आणि डॉ. सतीश पाटील हेच प्रबळ उमेदवार असतील अशी दाट शक्यता असून उबाठा गटाचे डॉ. हर्षल माने हे देखील उमेदवारीचे प्रबळ उमेदवार मानले जात आहेत. मात्र या सवीना अपवाद अमळनेर विधानसभा क्षेत्र आहे. या विधानसभा क्षेत्रात मंत्री अनिल पाटील यांच्यासह माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील यांची ग्रामीण भागावर पकड असली तरी या मतदार संघात उमेदवाराला मतदार कोणत्याही आमदाराला पुन्हा संधी देत नाहीत असा पायंडा आहे. या मतदार संघात माजी आमदार साहेबराव पाटील, डॉ. बी. एस. पाटील, शिरीष चौधरी असे नवनवीन आमदार अमळनेर विधानसभेतून एकेकदा निवडून गेलेले.