Assembly Election 2024 । राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच राज्याच्या विधानसभा मतदारसंघ क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा असलेल्या अक्कलकुवा (जि. नंदुरबार) विधानसभा मतदारसंघात दोन आमदारांमध्येच लढत रंगणार आहे. विद्यमान आमदाराविरुद्ध शिंदेसेनेने विधानपरिषदेचे सदस्य असलेल्या आमदारांनाच उमेदवारी दिल्याने ही लढत अधिकच लक्षवेधी ठरणार आहे. एवढेच नव्हे, तर या लढतीत माजी मंत्र्यांसह माजी खासदारांचाही उमेदवारी अर्ज असल्याने हा मतदारसंघ सध्या अधिकच चर्चेचा ठरला आहे.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ हा आमदार व माजी मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांचा मतदारसंघ. या मतदारसंघातून सलग सात वेळा ते विजयी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचेच पुत्र अॅड. गोवाल पाडवी हे विजयी झाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत यावेळी अॅड. के. सी. पाडवी यांना तगडे आव्हान देण्यासाठी राजकीय व्यूहरचना सुरू असल्याचे चित्र आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात शिवसेनेचे आमशा पाडवी यांनी उमेदवारी केली होती. मात्र, अवघ्या दोन हजार मतांनी ते पराभूत झाले होते. पुढे आमशा पाडवी यांना विधानपरिषदेचे आमदार करण्यात आले आणि आता पुन्हा शिंदेसेनेने त्यांनाच उमेदवारी देऊन अॅड. पाडवींपुढे आव्हान उभे केले आहे.
अर्थात दोन आमदारांमधली ही तगडी निवडणूक असली तरी त्यात माजी मंत्री अॅड. पद्माकर वळवी यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी भारत आदिवासी पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज भरल्याने काँग्रेससाठी ती अडचणीची ठरणार आहे.
कारण पद्माकर वळवी हे यापूर्वी तीन वेळा आमदार होते. गेल्या आठ महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत ते फारसे सक्रिय नव्हते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भारत आदिवासी पक्षाकडून अर्ज भरला आहे.
हीना गावितांच्या भूमिकेकडे लक्ष
तीन दिग्गज रिंगणात असताना पुन्हा चौथे दिग्गज उमेदवार माजी खासदार डॉ. हीना गावित यांचाही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज आहे. त्यांनी ही जागा भाजपला मिळावी, अशी मागणी करून भाजपतर्फेही अर्ज भरला होता. मात्र, एबी फॉर्म अभावी तो अर्ज अवैध ठरला. परंतु, अपक्ष म्हणून त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. त्यांची भूमिका काय राहणार हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.