Assembly Election 2024 । महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ‘महायुती’च जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला तसेच मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आ. मंगेश चव्हाण हे दुसऱ्यांदा उमेदवारी लढवत आहेत तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी उन्मेष पाटील हे निवडणूक लढवत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३६ लाख ५५ हजार ३४८ मतदार आज बुधवारी मतदानाचा हक्क बजावून १३९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात मुख्यतः लढत होत आहे.
२८८ विधानसभेच्या जागांसाठी ७ हजार ०७८ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील २ हजार ९३८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ४ हजार १४० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
हा आकडा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी जास्त आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ मतदारसंघांसाठी 3 हजार २३९ उमेदवार रिंगणात उतरले होते.