लोकसभा निवडणुकीत पराभवांना सामोरे जावे लागल्यानंतर आता येत्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. त्याची सुरूवात सिद्धविनायकाच्या दर्शनाने केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह सर्व मंत्री आणि आमदारांनी एकत्रित सिद्धविनायकाचे दर्शन घेतले. यापूर्वी रविवारी अजित पवार यांनी पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखीचे बारामतीत स्वागत करत पारंपारिक वेषात वारीत सहभाग घेतला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून तळागाळात काम करताना अजित पवार यांनी त्यांच्या धार्मिकतेचे हे असे सार्वजनिक प्रदर्शन कधीच केलेले पाहायला मिळाले नव्हते असे पक्षातील अनेकांनी म्हटले आहे.
इतकेच नव्हे तर अजित पवारांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी भरघोस निधीची तरतूद करत प्रत्येक दिंडीसाठी 20 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, अजित पवार यांच्यामध्ये हे बदल लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या झालेल्या पराभवानंतर पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे.