Assembly Elections : मुक्ताईनगर मतदारसंघात विधानसभेलाही श्रीराम पाटील ?

Muktainagar Assembly :  विधानसभेची निवडणूक लांब असली तरी लोकसभेची निवडणूक ही त्याचीच रंगीत तालीम होती. लोकसभेच्या निवडणुकीत रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा पराभव केलेला असला, तरी श्रीराम पाटील यांनी मोठी मते मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्रीराम पाटील यांचा जनाधार लक्षात घेता विधानसभेच्या आगामी निवडणुकीत त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) विचार केला जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दरम्यान, विधानसभेत कोणत्याच पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी ऍड. रोहिणी खडसे यांनी आपणच मुक्ताईनगर मतदासंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार असू असे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे मुक्ताईनगर मतदासंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) नेमकी कुणाला उमेदवारी देते ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभेच्या रावेर मतदारसंघात बराच शोध घेऊनही चांगला तुल्यबळ उमेदवार सापडत नव्हता. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून उद्योजक श्रीराम पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी देऊन  राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) मोठी खेळी खेळली. उमेदवार पाटील यांच्यासाठी खुद्द शरद पवार यांनी चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर आणि जामनेरात जाहीर सभा घेतल्या. त्यामुळे श्रीराम पाटील यांच्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास चांगली चालना मिळाली.

रावेरमधील मराठा व मुस्लीम मतदारांची मोठी संख्या लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत श्रीराम पाटील हे भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना शंभर टक्के मात देतील, अशी शक्यता देखील त्यामुळे व्यक्त होऊ लागली होती. प्रत्यक्षात निवडणूक निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील हे रक्षा खडसे यांच्याकडून सुमारे 2 लाख 72 हजार मतांनी पराभूत झाले. अर्थात, त्यानंतरही श्रीराम पाटील यांनी दिलेली कडवी झुंज चर्चेचा विषय ठरली. कारण, रावेर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा एवढी जास्त मते पराभूत उमेदवाराला पडली आहेत.

दरम्यान, लोकसभेच्या निकालानंतर कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मतदान झाले, त्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार रावेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात आणि रक्षा खडसे यांच्यात फक्त 36 हजार मतांचा फरक पडला आहे. कर्मभूमी असल्यानंतर रावेरमध्ये पाटील यांचा स्वतःचा प्रभाव देखील होता. त्यामुळे त्याठिकाणी त्यांनी चांगला लढा दिला. मात्र, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात श्रीराम पाटील आणि रक्षा खडसे यांच्यात जवळपास 47 हजार मतांचा फरक पडला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे यांनी स्वतःकडे जबाबदारी घेतल्यानंतर देखील मुक्ताईनगरात श्रीराम पाटील यांना चांगले मताधिक्य मिळू शकलेले नाही.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागलेले असले तरी अजून त्यास थोडा वेळ आहे. त्या आधीच ऍड. रोहिणी खडसे यांनी आपणच मुक्ताईनगर मतदासंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार असू असे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे मुक्ताईनगर मतदासंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) नेमकी कुणाला उमेदवारी देते ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.