Maharashtra Assembly Elections 2024 । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचं मतदान काल बुधवारी पार पडलं असून, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यात कुणाची सत्ता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, निकालाआधीच मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेल्या वादामुळे ‘मविआ’त मतभेद समोर आले आहेत.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदावर मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल. काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील. त्यामुळे मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
शिवसेना (उबाठा ) नेते व खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्या विधानाला उत्तर दिले आहे. राऊत म्हणाले, “हे विधान आम्ही मान्य करणार नाही. निर्णय महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र बसून घेतील. जर काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदासाठी सांगितले असेल, तर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी याची अधिकृत घोषणा करावी, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यापूर्वीही नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात वाद झाले आहेत. हरियाणामधील निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर राऊत यांनी टीका केली होती, ज्यावर पटोले यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी म्हटले होते की, गठबंधनाबाबत अशा प्रकारे सार्वजनिक आरोप करणे अयोग्य आहे.