मुख्यमंत्री सहाय्यता निधी : जळगाव जिल्हयातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी लाखाची मदत

जळगाव : जिल्ह्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपये देण्याला जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने मंजुरी दिली आहे. शेतकरी आत्महत्या समितीच्या बैठकीत नऊ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. या मध्ये सात तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश आहे.

जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत २७ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे पात्र, तर नऊ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. पात्र शेतकऱ्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची मदत मंजूर करण्यात आली आहे.

पात्र शेतकऱ्यांमध्ये (कै.) समाधान भीमराव वाघ (मुक्तळ, ता. बोदवड), आनंदा रामभाऊ पाटील, (एणगाव, ता. बोदवड), संजय सीताराम सोनवणे (शेलवड, ता. बोदवड), देवमन शंकर सोनवणे (चोरगाव, ता. धरणगाव), गणेश दगडू पवार (भोकर, ता. जळगाव), दीपक श्रावण जोहरे (फत्तेपूर, ता. जामनेर), विकास ऊर्फ सोनू नथ्थूसिंग पाटील (जवखेडा, ता. जळगाव), पंकज राजेंद्र पाटील (गणपूर, ता. चोपडा), अनिल श्‍यामराव पाटील (मोहरद, ता. चोपडा), ज्ञानेश्‍वर विठ्ठल गायकवाड (शेंदुर्णी, ता. जामनेर), ज्ञानेश्‍वर संजय धनगर (ताडे, ता. एरंडोल), संजय मिठाराम महाजन (धरणगाव), गोरख ईश्‍वर महाजन (नंदगाव बुद्रुक, ता. एरंडोल), रघुनाथ त्र्यंबक कुंभार (तारखेडे, ता. पाचोरा), वाल्मीक वामन पाटील (पिंपळगाव खुर्द प्र.भ., ता. पाचोरा), सचिन प्रकाश पाटील (मनूर, ता. बोदवड), ज्ञानदेव श्रावण मंडलिक (भानखेडा, ता. बोदवड) या मृत शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.