जळगाव : धरणगाव येथील मनरेगा पंचायत समितीच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकार्याला जळगाव एसीबीने दिड हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहात अटक केली. प्रविण दिपक चौधरी (वय 39 ) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या शेत शिवारात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठा शेड तयार करण्याचा कार्यारंभ आदेश देण्याच्या मोबदल्यात प्रवीण चौधरी यांनी तक्रारदार यांच्याकडे 2000 रू लाचेची मागणी केली. तडजोडी 1500/- रू लाच रक्कम स्विकारली. तसेच तक्रारदार यांना लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहीत केले म्हणून तांत्रिक सहाय्यक उमेश किशोर पाटील ( वय 36) याला देखील अटक करण्यात आली.
याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.