Swachh Tirtha Abhiyan: स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत श्रीराम मंदिरात खासदार डॉ. सुभाष भामरेंकडून स्वच्छता

Swachh Tirtha Abhiyan: अयोध्येत श्रीराम जन्मभूमीच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरात सोमवारी (ता. २२) श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे येथील खोल गल्लीतील श्रीराम मंदिरात स्वच्छता अभियान राबवत मंदिराची स्वच्छता केली.

तब्बल ५०० वर्षांनंतर प्रत्येक भारतीयाचे अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे त्यांच्या जन्मभूमीतील मंदिर अखेर साकारले आहे. या मंदिरात येत्या सोमवारी दुपारी बारा वाजून २० मिनिटांनी प्रभू श्रीराम, माता सीता, श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे.

या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास महाराज यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनीही शुक्रवारी दुपारी येथील खोल गल्लीतील प्रभू श्रीराम मंदिरात जाऊन झाडू मारण्यासह फरशी पुसणे, प्रभू श्रीराम, माता सीता, श्री लक्ष्मण व श्री हनुमान यांच्या मूर्तींचीही स्वच्छता केली.

यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, उपाध्यक्ष राजेंद्र खंडेलवाल, उपाध्यक्ष संजय बोरसे, सुहास अंपळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश परदेशी, उपाध्यक्ष अनिल दीक्षित, भाजपचे जिल्हा प्रवक्ते श्यामसुंदर पाटील, प्रा. सागर चौधरी, गोपाल चौधरी, भाजप कार्यालय प्रमुख प्रकाश उबाळे, अनिल सोनार यांच्यासह मंदिराचे पुजारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.