मविआच्या वज्रमुठ सभेला नाना पटोलेंची दांडी; काय कारण?

politics : छत्रपती संभाजीनगरात आज (रविवारी) महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऐनवेळी वज्रमुठ सभेकडे पाठ फिरवली. त्यामुळे पटोले यांनी सभेला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आजच्या या सभेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खरी लढत ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

अजित पवार, अशोक चव्हाण, यांच्या दमदार भाषणा नंतर उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्न उपस्थित करीत भाजपला त्यांनी सवालच केला.

दरम्यान या सभेला तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभेला पाठ फिरवली पटोले यांची प्रकृती ठिक नसल्याने ते येवू शकले नाहीत असं सांगण्यात आलं मात्र, पटोलांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधान आलं आहे.