मणिपूर राज्यातील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवार, 4 रोजी आदिवासी समन्वय समितीच्या नेतृत्वात विविध समविचार संघटनांतर्फे आक्रोश मोर्चा काढत केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन करीत जाहीर सभाही घेण्यात आली.
आदिवासी समन्वय समितीच्या नेतृत्वात लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, सचिन धांडे, करण सोनवणे, कैलास मोरे, सुश्मिता भालेराव, पन्नालाल मावळे आदींनी आक्रोश मोर्चाचे नेतृत्व केले. जिल्हाभरातील विविध भागातील सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक आदिवासी बांधवांसह समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जी.एस. मैदानापासून मोर्चास प्रारंभ झाला. शिस्तीने आदिवासी बांधव मोर्चात सामील झाले. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल चौक, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मोर्चाला पोलिसांनी रोखले. याच ठिकाणी मोर्चेकरी आदिवासी बांधवांनी ठिय्या मांडला.
सभेत प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, सचिन धांडे यांच्यासह आदिवासी समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. मुकुंद सपकाळे म्हणाले की, अन्याय, अत्याचार आणि शोषणग्रस्तांची जात, धर्म किंवा कुठलाही पंथ असत नाही, अशा सर्वानाच माणूस म्हणून मदत करण्याची त्यांना एक जीवन जगण्याची हमी मिळवून देण्यासाठी माणसातली माणुसकी जागृत करण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांवर अत्याचार करणार्यांना फाशी द्यावी. यासंदर्भातील खटला जलद गती न्यायालयात चालवावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
मणिपूरमध्ये काही महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. हिंसाचाराला कारणीभूत ठरणार्या आणि अत्याचारात सहभागी होणार्या संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रतिभा शिंदे यांनी केली.