डीजेचा आवाज : खवळलेल्या मधमाश्यांनी नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाडावर चढवला हल्ला; २५० वऱ्हाडी जखमी

बुलढाणा : मधमाश्यांनी अनेक ठिकाणी लोकांवर हल्ला केल्याचे आपण सशोल मीडियावर वाचले असलेच अशीच एक घटना समोर आली आहे. डीजेच्या आवाजाने खवळलेल्या मधमाश्यांनी लग्नाच्या वऱ्हाडावर हल्ला केला. यामध्ये नवरदेवासह २५० वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. या घटनेतील जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व धोक्याबाहेर आहेत.

सूत्रानुसार माहिती समोर आली असून, बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे मंगळवारी सायंकाळी एका लग्न समारंभाची मिरवणूक सुरू होती. घोड्यावरुन वाजत गाजत मिरवणूक जात असतानाच डीजेच्या आवाजाने झाडावरील आगमोहोळावरील माशा चांगल्याच खवळल्या. ज्यामुळे मधमाश्यांनी नवरदेवासह संपूर्ण वऱ्हाडावर जोरदार हल्ला चढवला.

अचानक झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण वरातीत एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर वऱ्हाडी मंडळी, बँडवाले, लग्न समारंभाचे फोटो व व्हिडिओ शूटिंग करणारा फोटोग्राफर सह सर्वच आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत सुटले.

या हल्ल्यामध्ये जवळपास २५० वऱ्हाड्यांना मधमाशांनी चावा घेतला, तर नवरदेवाला तात्काळ जवळच्या एका खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. या उपचारानंतर नंतर रात्री ८:०० वाजता हे लग्न मोजक्याच लोकांच्या उपस्थिती उरकण्यात आल.