जळगाव : शिपायाच्या नोकरीसाठी मुख्याध्यापकाच्या घरावर घरावर दगडफेक करून घराच्या खिडक्या तोडल्याचा प्रकार समोर आली आहे. शहरातील कोल्हेनगरात २९ रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पेालिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकी घटना काय?
वरणगाव ऑर्डिन्स फॅक्टरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र वसंतराव भोईटे (वय ५४) हे पत्नी संगीता, मुलगी भाग्यश्री यांच्यासह कोल्हेनगरात वास्तव्यास आहेत. गुरुवारी (ता. २९) रात्री दीडच्या सुमारास भोईटे कुटुंब झोपले असताना, कल्पेश संभाजी भोईटे (रा. दादावाडी) व त्याच्यासोबत एक अनोळखी, असे दोघे महेंद्र भोईटे यांच्या निवासस्थानी आले. वरणगाव येथील ऑर्डिन्स फॅक्ट्री माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून नोकरीला लावा, यासाठी दोघांनी मुख्याध्यापक भोईटे यांच्याघराच्या कंपाऊंडमध्ये उभ्या दोन दुचाकीसह कारची नासधूस केली.
तसेच शिवीगाळ करत आरडाओरड केली. घरात उभी दुचाकी (एमएच १९, सीएन ६५५०) व इलेक्ट्रीक मोपेड फोडली. घराबाहेरील कार (एमएच १९, सीव्ही ६५५०)वर घरातील कुंड्या उचलून फेकत नासधूस केली. घरावर दगडफेक करून घराच्या खिडक्या तोडल्या. याप्रकरणी रामानंदनगर पेालिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक सुनील पाटील तपास करीत आहे.