जळगाव । जळगाव शहरातील वाघ नगर स्टॉपजवळ पूर्व वैमनस्यातून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला केला. यात एकाने गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली ती अक्षय सिताराम तायडे (वय २६) याच्या मांडीला चाटून गेल्याने तरुण जखमी झाला.तर दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून तो जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान घटनेतील दोघा जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय आहे नेमकी घटना?
शहरातील वाघ नगर स्टॉप परिसरात अक्षय सीताराम तायडे आणि त्याचा मित्र अक्षय सुरेश लोखंडे हे दोन तरुण दुचाकी लावून उभे होते. याच दरम्यान, रात्री १० वाजेच्या सुमारास आठ ते दहा जणांचे टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी दुचाकीजवळ उभ्या असलेल्या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी टोळक्याने तरुणावर गोळीबार केला. यामध्ये अक्षय तायडे या तरुणाच्या मांडीला गोळी चाटून गेल्याने तरुण जखमी झाला.
टोळक्याने केलेल्या हल्ल्यात अक्षय लोखंडे या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून तो जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर टोळक्याने त्या तरुणांच्या दुचाकींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी तेथील दगड उचलून दुचाकीवर टाकून त्यांचे नुकसान झाले. यामध्ये दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीडी.८६२४ व एमएच.१९.ईडी.८८७९ क्रमांकाच्या दुचाकींचे नुकसान झाले आहे.
या घटनमुळे परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान, वाद पूर्ववैमनस्यातून झाला असून दुपारी एका उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती.यातून हा हल्ला झाल्याचं समजतंय. दरम्यान या प्रकरणी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होते.