इलॉन मस्कची व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर! ‘एक्स’ वर होणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल

नवी दिल्ली : इलॉन मस्कने आज एक मोठी घोषणा केली आहे. एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळणार आहे. मस्कने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून याबाबत पोस्ट केली आहे. “एक्सवर आता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्स करता येतील. लवकरच हे फीचर उपलब्ध होणार आहे. या फीचरमुळे आता एक्स हे थेट मेटाच्या व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देऊ शकतं.

आयफोन, अँड्रॉईड, अ‍ॅपल मॅकबुक आणि विंडोज किंवा अन्य पीसी अशा सर्व डिव्हाईसेसना हे फीचर्स सपोर्ट करणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, एक्स अकाउंटच्या माध्यमातून हे ऑडिओ/व्हिडिओ कॉल्स होत असल्यामुळे; समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर तुमच्याकडे असण्याची गरज नाही. म्हणजेच यूजर्स आता आपला नंबर शेअर न करताही एखाद्याशी फोनवर बोलू शकणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल करण्यासाठी आपल्याकडे समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर असणं आवश्यक आहे. एक्सवर कॉल करताना याची आवश्यकता नसल्यामुळे लोक याचा अधिक वापर करण्याची शक्यता आहे. ‘एक्स’ हे एकप्रकारे ग्लोबल अ‍ॅड्रेस बुक ठरेल, असं इलॉनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.