श्रीराम ध्वज अन् पताकातून ‘हिंदू’ अस्मितेचा जागर; मुस्लिम बांधवांतही श्रीराम प्रेम

विशाल महाजन
पारोळा :
हिंदू अस्मितेचा श्वास प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गल्लीबोळात चौका-चौकात घरोघर घरांवर भगवा ध्वज अन पताका लावून हिंदू अस्मितेचा जागर करण्यात येत आहे.

अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराची उभारणी व्हावी, अशी करोडो हिंदू बांधवांची ज्वाजल्य इच्छा होती. इच्छा पूर्णत्वास यायला ५०० ते ५५० वर्षाचा कर्दनकाळ लोटला गेला. मैदानावरची लढाई ते न्यायालयीन लढाई असा हा प्रदीर्घ काळ संघर्षातून इच्छा फळाला आली आहे. त्यामुळे नानाविध उपक्रमातून प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा संस्मरणीय बनवून आनंदोस्तव साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरासह ग्रामीण भागात गल्लोगल्लीत घरा-घरांवर मोठया उत्सहाने भगवा ध्वज आणि पताका लावली जात आहे. त्यामुळे चैतन्य निर्माण झाले आहे.

भवानी गडाकडून १० हजार ध्वज वाटप

भगवा ध्वज म्हणजे आपल्या राष्ट्राची अस्मिता आहे. हिंदुधर्माची विजयपताका म्हणूनच हा ध्वज पाहिला की देशाचा गौरवशाली इतिहासाचे स्मरण होते. या भावनेतून भवानी गड संस्थानचे अध्यक्ष डाँ. मंगेश तांबे यांनी तब्बल १० हजार ध्वजाचे मोफत वाटप केले आहे. जास्त मागणीमुळे किंमती वाढल्या आहेत. तरी अजूनही कुणाला ध्वज मिळाले नसतील त्यांनी संपर्क साधून मोफत ध्वज घ्यावे असे आव्हान डाँ. तांबे यांनी केले आहे.

मुस्लिम बांधवांतही श्रीराम प्रेम

शहरातील काही मुस्लिम समाज बांधवांनी देखील प्रभू श्रीराम ध्वज घेवून गेल्याचे डाँ. तांबे यांनी सांगितले. यामुळे मुस्लिम समाज बधवांमध्ये देखील श्रीराम प्रेम पहावयास मिळाले. सबके श्रीराम’चा प्रत्यय या निमित्ताने उपस्थितांना आला. यावेळी मोहित तांबे, दीपक पिले, अनिल वाणी, जगन महाजन उपस्थित होते.