अयोध्येत रामललाच्या चरणी १०० कोटींचे दान; दररोज ढीगाने वाढतेय रक्कम

अयोध्या : अयोध्येत रामलला दर्शन घेण्यासाठी केवळ देशातूनच नव्हे तर जगभरातून रामभक्त येत आहेत. प्राणप्रतिष्ठेपासून दररोज सुमारे दोन ते अडीच लाख भाविक रामलला दर्शनासाठी येत असल्याचा श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा अंदाज आहे. एका आकडेवारीनुसार, आतापर्यंत सुमारे ६२ लाख भाविकांनी अयोध्येत येऊन रामदर्शन घेतले आहे. यातच एका महिन्याच्या काळात राम मंदिरात सुमारे १०० कोटींचे दान भाविकांनी दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामलला प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाल्यापासून एका महिन्यात १०० कोटींपेक्षा अधिकचे दान प्राप्त झाले आहे. भाविकांनी धनादेश किंवा पावतीद्वारे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला अर्पण केलेले हे दान आहे. तर, दानपेटी आणि ऑनलाइन बँक खात्यावर पाठवलेली रक्कम वेगळी आहे. त्याची माहिती बँकेमार्फत दिली जाणार आहे.

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष  महंत गोविंद देवगिरी महाराज यांनी याबाबत सांगितले की, १९ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत ५० कोटींहून अधिक रुपये भाविकांनी दान-देणग्या दिल्या आहेत. अलीकडेच जमशेदपूर, झारखंड येथील एका कंपनीने रामललाला ११ कोटी रुपये अर्पण केले.

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, या एका महिन्यात २५ किलो चांदी आणि १० किलो सोने भक्तांनी रामलला यांना अर्पण केले आहे. या सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये मुकुट, हार, छत्री, रथ, बांगड्या, याशिवाय इतर वस्तूंमध्ये खेळणी, दिवे, उदबत्ती स्टँड, धनुष्यबाण यांचा समावेश आहे. भाविकांनी सोन्या-चांदीची भांडी आणि रत्न अर्पण केली आहेत.