मुंबई : अयोध्या येथील २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. मात्र या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळालं नसल्याचं सांगत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राऊतांच्या टीकेला भाजप नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. राम मंदिर उभारणीत उद्धव ठाकरेंचं काय योगदान? असा सवाल देखील महाजन यांनी विचारला आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या उद्घाटनच्या निमंत्रणावर बोलतांना खासदार राऊत म्हणाले होते की, “उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला या सोहळ्याचं निमंत्रण नाही. या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं नसतं. कारण राम मंदिर उद्घाटन सोहळा हा श्रेय घेण्याचा एक भाग बनला आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणीत शिवसेनेचं योगदान फार मोठं आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान खूप मोठं आहे, असंही राऊत म्हणाले.
या टीकेला उत्तर देत महाजन यांनी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न बोलावल्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, खरं म्हणजे आमच्या नेत्यांनीही वारंवार सांगितलं की, त्यांचं काय योगदान आहे. मी दोनवेळा कारसेवेत गेलो होतो, २० दिवस तुरुंगात होतो. जेव्हा बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, तेव्हा त्यावेळीही मी तिथे होतो. उद्धव ठाकरे कोठे होते?, ते घरातच बसलेले होते, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
तुम्हाला बोलावलं नाही, याचं तुम्हाला वाईट का वाटतं. तुम्ही साधे आमदार आहात, एमएलसी. तेही विधानसभेत कधी पाय ठेवत नाही, कधी येऊन बघत नाही. मग त्यांना अयोध्येला बोलावलं काय, किंवा नाही बोलावलं काय, कारण तिथे खूप मोठे व्हीव्हीआयपी येत आहेत. मला वाटतं शासनाच्यादृष्टीने उद्धव ठाकरे व्हीव्हीआयपी नसतील. म्हणूनच, त्यांना बोलावलं नसेल, असा खोचक टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला.