वेध
– अभिजित वर्तक
‘जगातील अतिप्राचीन वैद्यकीय उपचारपद्धती’ अशा शब्दात जिचे वर्णन केले जाते, त्या Ayurveda आयुर्वेदाला पुन्हा गौरवाचे आणि वैभवाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार अविरतपणे कार्यरत आहे.
जे जे म्हणून अस्सल भारतीय आहे आणि जे जगातही प्रभावी ठरेल असे आहे, त्या सगळ्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जी प्रखर इच्छाशक्ती लागते ती मोदी सरकारमध्ये आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना केल्यापासून आयुर्वेदाचे महत्त्व अधिकाधिक वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केवळ भारतात किंवा आशिया खंडातच नव्हे तर संपूर्ण जगात पुन्हा आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार कसा होईल, या दृष्टीने मोदी सरकारची पावले निर्धारपूर्वक पडत आहेत. हे सर्व लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे आसामची राजधानी गुवाहाटी येथे तीन दिवसांपूर्वी द्विदिवसीय जागतिक एसजीओ बी-टू-बी परिषद (शांघाय सहकार्य संघटना) पार पडली. 17 देशांमधील 150 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी या परिषदेत उपस्थित होते. पारंपरिक औषधी आणि उपचारपद्धती हा या परिषदेतील एक महत्त्वाचा विषय होता.
Ayurveda आयुर्वेद औषधांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था कशी वाढविता येईल, याविषयी परिषदेत विचारमंथन करण्यात आले. मॉडर्न मेडिसिन म्हणजेच आधुनिक चिकित्सा प्रणाली अर्थात अॅलोपॅथीला पर्यायच नाही, असे चित्र जागतिक स्तरावर निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या दोन अडीचशे वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. पाश्चिमात्य देशांमधील आणि अमेरिकेतील बड्या औषधनिर्मिती क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्या अशा प्रकारच्या प्रचारात सातत्याने आघाडीवर आहेत. आपल्या पॅथीला कोणी स्पर्धकच राहू नये, आपली व्यावसायिक दुकानदारी व्यवस्थित चालावी म्हणून सातत्याने एकाच चिकित्सा प्रणालीच्या प्रचाराचा सातत्याने भडिमार केला जातो. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाल्यास अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, चुंबक चिकित्सा, अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशर, निसर्गोपचार या सर्वच चिकित्सा प्रणालींची बलस्थाने आणि मर्यादा दोन्ही आहेत. कुठलीच पॅथी स्वत:ला परिपूर्ण म्हणवून घेऊ शकत नाही. किंवा आमचीच उपचारपद्धती एकमेव प्रभावी असे म्हणू शकत नाही. असे असते तर सर्दी-खोकल्यावर अँटिबायोटिक्स घेऊ नका, असे इंडियन मेडिकल असोसिएशनला निवेदन काढून म्हणावे लागले नसते. तसेच रुग्णांना अँटिबायोटिक्स लिहून देण्यापूर्वी संसर्ग जीवाणूजन्य आहे की नाही याचे निदान डॉक्टरांनी करावे, अशी शिफासही आयएमएने केली आहे.
कोरोना काळात तर सर्वच पॅथींच्या मर्यादा आणि त्यांची बलस्थाने अर्थात प्लस पॉईंट अधोरेखित झालीत. मात्र, आयुर्वेदाबाबत सांगायचे झाल्यास भारताच्या या प्राचीन वैद्यकीय प्रणालीचा म्हणावा तसा प्रचार व प्रसारच जागतिक स्तरावर झाला नाही. कारण ज्यांचे व्यावसायिक हितसंबंध धोक्यात येत होते अशा घटकांनीच सातत्याने Ayurveda आयुर्वेदाविषयी गैरसमज पसरविण्यास सुरुवात केली. मात्र, युरोपातील अनेक प्रगत देशांनी आयुर्वेदाचे महत्त्व ओळखून त्यावर स्वतंत्रपणे संशोधन, अभ्यास सुरू केला. अनेक प्रकल्प सातत्याने राबविले. भारताला मात्र स्वत:च्याच देशातील या प्राचीन वैद्यकीय प्रणालीचा विसर पडला. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर मात्र चित्र चांगल्या प्रकारे पालटले असून आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात आयुर्वेदाचा प्रसार करण्यास मोदी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीच आयुष मंत्रालयाचे आयुर्वेद सल्लागार डॉ. मनोज नेसरी यांनी दिली. त्यामुळेच पुढील काही दिवसांत आयुर्वेदाचा डंका संपूर्ण जगात वाजल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे. आयुर्वेदाची विश्वसनीयता वाढविण्यासाठी प्रत्यक्ष वैद्यकीय चाचण्यांची आणि संशोधनाची गरज आहे, असे अनेक तज्ज्ञांचे प्रामाणिक मत आहे.
केंद्रातील मोदी सरकारची पावले त्यादृष्टीने पडत आहेत. अनेक आयुर्वेदिक संशोधन प्रकल्प आणि चाचण्यांना केंद्राने मान्यता दिली आहे. अगदी आधुनिक चिकित्सा प्रणालीच्या धर्तीवर आयुर्वेदाचीही स्वतंत्रपणे उपचार यंत्रणा विकसित करण्याविषयी सरकारने आणि Ayurveda आयुर्वेदिक औेषधांचे उत्पादन करण्यार्या स्वदेशी कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. आयुर्वेदाला सुमारे 5000 वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान. इतर वैद्यकीय शास्त्रांपेक्षा आयुर्वेदाचा जोर रोगांवर उपचारांपेक्षा निरोगी जीवनावर अधिक आहे. आयुर्वेदाचा मूळ उद्देश उपचार प्रक्रियेला वैयक्तिक करणे असा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतिजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकारशक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो. आयुर्वेदिक औषधांचा विशेषतः लहान मुलांना फार उपयोग होतो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. आयुर्वेदानुसार एका वर्षाची वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर अशा सहा ऋतूंमध्ये विभागणी केलेली आहे. त्या त्या ऋतूंमधील होणार्या वातावरणातील बदलांप्रमाणे आपला आहारविहार कसा असावा याचे फार उत्तम वर्णन आयुर्वेदामध्ये केलेले आहे. भारतीयांनीही सकारात्मक प्रतिसाद देत शक्य होईल तसे आयुर्वेदाला अधिकाधिक बळकटी कशी मिळेल यादृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे.
– 9422923201