नंदुरबार : केंद्र सरकार व राज्य शासनाने हाती घेतलेल्या विविध ओरोग्याच्या सेवा पुरविणाऱ्या मोहिमेपैकी आयुष्मान भव हे एक अभियान आहे. जिल्ह्यातील दुर्गम तथा अतिदुर्गम भागातील, वाड्या-पाड्यातील शेवटची व्यक्तीही आरोग्याच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
ते आज जिल्हा सामान्य रूग्णालयात आयुष्मान भारत अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. सावन कुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना म्हणाले, या मोहिमेत 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘सेवा पंधरवड्या’ दरम्यान या अभियानाचे तीन मुख्य स्तंभ असतील, ज्यामध्ये जिल्ह्यातील आरोग्य आणि कल्याण केंद्रांवर आयुष्मान मेळा आयोजित केला जाईल. याशिवाय आयुष्मान कार्ड वितरणाची प्रक्रिया जलद केली जाईल आणि आयुष्मान बैठका आयोजित केल्या जातील. आरोग्याच्या क्षेत्रात आदर्श निर्माण करणारी गावेही आयुष्मान गाव म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या योजनांचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात येत आहे, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.