B Assembly Constituency : अजित पवार लढणार नाहीत ? सुनिल तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Baramati Assembly Constituency : अवघ्या दीड महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कंबर कसून कामाला लागले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. अशातच राजकीय वर्तुळातील मोठी बातमी समोर आली आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुत्र जय पवार यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. आता यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. सात ते आठ वेळा बारामतीमधून निवडणूक लढलो त्यामुळे मला आता रस राहिला नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

दरम्यान, बारामतीमधून अजित पवार यांच्याऐवजी जय पवार लढण्याची शक्यता आहे. जय पवार यांना उमेदवारी देण्याच्या मागणीवर अजित पवार म्हणाले की, आमच्या भागातील जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यास मी तयार आहे.

मी सात, आठ वेळा निवडणूक लढलो आहे. त्यामुळे मला आता रस राहिला नाही. जय पवार यांच्या बारामतीतील उमेदवारीवर संसदीय मंडळ निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. तर अजित पवार यांच्याकडून नव्या विधानसभा मतदारसंघाची चाचपणी सध्या सुरू आहे.

 काय म्हणाले सुनिल तटकरे ?
मी लढणार नाही असं वक्तव्य दादांनी केलं नाही. विनाकारण दादांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. विधानसभेच्या निवडणुका महायुतीत राष्ट्रवादी पक्ष अजित दादांच्या नेतृत्वात लढणार आहे. पक्षाला यश अधिक कसे मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दादा नेमकं कुठल्या उद्देशाने म्हणाले ते दादांशी चर्चा करून तुम्हाला कळवीन, असं तटकरे म्हणाले.