मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे म्हणजेच बाबामहाराज सातारकर यांचे निधन झाले. वयाच्या ८९ वर्षी बाबामहाराज सातारकर यांनी अखेरचा श्वास घेतला. नवी मुंबईतील नेरूळमध्ये ते वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी ३ वाजता नेरूळच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बाबामहाराज सातारकर यांचा परिचय व कार्य
अनोख्या कीर्तन शैलीच्या माध्यमातून बाबामहाराज सातारकार यांनी अध्यात्म आणि भागवत संप्रदायाचा विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवला. जगभरात त्यांच्या कीर्तनाचे भरपूर कार्यक्रम झाले. महाराष्ट्राच्या गावागावांत त्यांच्या कीर्तनाचे अनेक कार्यक्रम झाले. सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातार्यात झाला. पुढे त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव आहे.
१३५ वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनीही पुढे सुरू ठेवली. त्यामुळे तीन पिढ्यांपासून मिळालेला कीर्तनाचा व प्रवचनाचा वारसा त्यांनी जपला. १०वी पर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या बाबा महाराजांनी पुढे कीर्तनातून प्रबोधनाची वाट धरली आणि समाजप्रबोधन केले. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दीक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात.