मुंबई : महिलांच्या कपड्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी योगगुरू बाबा रामदेव यांनी लेखी मागितली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. ठाण्यात आयोजित केलेला संपूर्ण कार्यक्रम महिला सशक्तीकरणवर आधारित होता. या कार्यक्रमातील काही सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमधील माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस१/२ pic.twitter.com/umI27luSK7
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 28, 2022
बाबा रामदेव यांनी माफिनाम्यात म्हटले आहे की, महिला आयोगाच्या नियमांनुसार मी कोणताही गुन्हा केला नाही. भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओसारख्या स्त्री सक्षमीकरणाच्या अनेक योजनांना मी नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. तसंच, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी विविध सामाजिक संस्थांसोबत कामही करतो. त्यामुळे कोणत्याही महिलेचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता.
मी आई आणि मातृशक्तीचा नेहमीच गौरव केला आहे. माझ्या एक तासाच्या लेक्चरमध्येसुद्धा मातृशक्तीचाच गौरव करण्यात आला आहे. यामध्ये एक शब्द मी वस्त्रांसदर्भात बोललो आहे. याचा अर्थ माझ्यासारख्या साध्या वस्त्रांचा होता. मात्र, तरीही माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. मी त्या सर्वांची माफी मागू इच्छितो. ज्यांचा माझ्यामुळे भावना दुखावल्या गेल्या.