IND vs SA : क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी, तुटतील मनं…

IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर होण्याची भीती बळावली आहे. घोट्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला मोहम्मद शमी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही आणि त्यामुळे 12 दिवसांनी सुरू होणाऱ्या मालिकेत त्याची खेळण्याची शक्यता कमी झाली आहे. एका वृत्तानुसार, शमी शुक्रवारी 15 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार्‍या कसोटी संघातील खेळाडूंसोबत नसेल. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) अद्याप प्रलंबित आहे.

शमी संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर असण्याची शक्यता असल्याचा दावा क्रिकबझच्या अहवालात करण्यात आला आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन सारखे स्टार खेळाडू शुक्रवारी कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील पण शमी त्यांच्यासोबत नसेल. शमीला घोट्याला दुखापत झाली असून सध्या तो त्यातून सावरत आहे. तथापि, त्याला ही दुखापत केव्हा झाली, हे स्पष्ट नाही कारण शमी 2023 च्या विश्वचषक अंतिम फेरीपर्यंत खेळत राहिला आणि या कालावधीत कोणतीही दुखापत झाली नाही, तर विश्वचषकानंतर तो एकही सामना खेळला नाही.

दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड मजबूत
33 वर्षीय अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाजाने विश्वचषकातील 7 सामन्यांमध्ये सर्वाधिक 24 बळी घेतले होते. त्याच्या या फॉर्मनंतर, शमी दक्षिण आफ्रिकेत अशीच कामगिरी दाखवेल आणि टीम इंडियाला येथे पहिली कसोटी मालिका जिंकण्यास मदत करेल याची सर्वांना प्रतीक्षा होती. आता शमीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेत शमीचा रेकॉर्ड मजबूत आहे. येथे त्याने 16 डावात 23 च्या सरासरीने 35 विकेट घेतल्या आहेत. गेल्या दौऱ्यावर त्याने 3 कसोटीत 14 विकेट घेतल्या होत्या.

संघात कोणाला स्थान मिळणार?
शमी खेळला नाही तर प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या गोलंदाजाला स्थान मिळेल हा प्रश्न आहे. वरवर पाहता, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांसाठी 4 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरेल, ज्यामध्ये शार्दुल ठाकूरला चौथा गोलंदाज म्हणून स्थान मिळण्याची खात्री आहे. आता शमीच्या अनुपस्थितीत मुकेश कुमारच्या रूपाने संघात वेगवान गोलंदाजाचा एकच पर्याय उरला आहे. मात्र, सध्या दक्षिण आफ्रिकेत असलेल्या आणि प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाचाही निवडकर्त्यांमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. त्याने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध हॅट्ट्रिकसह 5 विकेट घेत आपला दावाही पक्का केला आहे.