नंदुरबार : जिल्ह्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या बेमोसमी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तळोदा तालुक्यातील मोड, बोरद परीसरात केळी, पपई, कापुस, कांदे आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी आर्थिक गणित बिघडले असून, कंबरडे मोडले गेले आहेत.
लाखोंचा खर्च करूनही हातात एक दमडी आली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात पुन्हा वातावरण बदलाचा परिणाम केळी पिकांवर होतांना दिसून येत आहे. करपासह अनेक रोगांचा प्रादुर्भाव केळी पिकावर दिसून येत आहे. तर दुसरीकडे परिपक्व झालेल्या केळी फळ झाडावरच पिकत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे तळवे, मोड, बोरद परिसरातील केळी उत्पादक शेतकरी पुर्णपणे मेटाकुटीला आला आहे.
केळी पीक हे वर्षभराचे असल्याने त्यावर शेतकरी मोठ्या प्रमाणावर खर्च करतो. मागिल दोन तीन महिन्यांवर केळीला चांगल्या प्रकारे भाव असल्याने शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, 26 व 27 नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे मोहिदा, मोड, बोरद सह अनेक भागांतील गावांमध्ये लाखोंचे नुकसान झाले. त्यानंतर वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल जाणवू लागला.
सकाळी थंडी, धुके व ऊन-सावलीच्या खेळामुळे केळी पिकावर वातावरणाचा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे केळीच्या फळावर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही शेतकरी केळी पिवळे होण्याचे कारण करपाचा प्रादुर्भाव असल्याचे सांगत आहेत. विशेषतः शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन नसल्यामुळे ते द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत.
मागिल हंगामात साडेचार एकरात केळी पिकाची लागवड केली होती. दरम्यान वर्षभर त्यावर लाखोंचा खर्च केला. मात्र, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी व वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता परिपक्व झालेले केळीचे फळ झाडावरच पिकु लागले आहे. त्यामुळे ह्या वर्षीचा हंगाम पुर्ण वाया जाण्याची भिती आहे – अंबालाल शिंदे, शेतकरी, मोड