Badlapur School Crime : दोन चिमुकलींवर अत्याचारप्रकरणी बदलापुरातील नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांकडून रेल रोको आंदोलन, तर पालकांकडून शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलनही सुरु आहे. आता या आंदोलनाला दुपारी १ च्या सुमारास हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली असून, पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला.
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना १२ आणि १३ ऑगस्ट रोजी घडली. या दोन्ही चिमुकली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला.
पीडित चिमुकली शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडलीस आला. तसेच याच प्रमाणे आणखी एका चिमुकलीसोबतही असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
यानतंर पीडितच्या पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. यानंतर पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणी आज बदलापूरकरांकडून बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला व्यापारी संघटना, स्कूलबस संघटना आणि रिक्षा संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच पालकांकडूनही बदलापूरच्या शाळेजवळ ठिय्या आंदोलन सुरु आहे.