तरुण भारत लाईव्ह । जळगाव : जिल्हा पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केला असून यामध्ये गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह तलवारींचा समावेश आहे. या गुन्ह्यातील संशयितांना जामीन लवकर मिळणार नाही, अशा प्रकारची कलमे लावण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आज पत्रपरिषदेत माहिती दिली.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलिस, भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी पथक यांनी शस्त्रसाठा जप्तीच्या कारवाया केल्या आहेत. यामध्ये ४ गावठी कट्टे, ५ तलवारी, दोन चॉपर, एक चाकू यासह जिवंत काडतुसे, वाहने आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. बेकायदा शस्त्र पुरवठ्याचे रॅकेट जिल्ह्यातून उकरून काढण्यासाठी माहिती मिळवली जात आहे. आर्म्स ॲक्ट अंतर्गत यापुढेही अधिक तिव्रतेने कारवाई केली जाईल. तेलंगणा, मध्य प्रदेश, पंजाब व जळगाव जिल्हा पोलिसांनी यापूर्वी संयुक्तपणे चोपडा भागात संयुक्त कारवाया केल्या आहेत. नऊ इंचापेक्षा अधिक उंचीचे पाते असलेले धारदार शस्त्र जवळ बाळगणे हा गुन्हा आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पत्रकार परिषदेला भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश बुवा उपस्थित होते.
जनतेला आवाहन…
पोलिसांनी आर्म्स ॲक्ट अंतर्गत जास्तीत जास्त कारवाया करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जनतेने बेकायदा शस्त्रांची माहिती द्यावी. त्याची तातडीने दखल घेऊन कारवाई केली जाईल. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिस अधीक्षकांनी यावेळी सांगितले.