काबूल: अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने पाकिस्तानी रुपयाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये कुठेही कुठल्याही खरेदी – विक्रीच्या व्यवहारांमध्ये पाकिस्तानी रुपयाचा वापर होणार नाही असे तेथील तालिबान सरकारने जाहीर केले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पैशांच्या अवैध हस्तांतरणविरोधी कायद्यांतर्गत ही कारवाई तालिबान सरकारने केली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर घातपाती कारवाया करून शांतात बिघावण्याचा आरोप केला आहे. या घडामोडींमुळे दक्षिण आशियातील या दोन शेजारी राष्ट्रांचा वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.
या आदेशान्वये १ ऑक्टोबर पासून हे निर्बंध लागू होणार आहेत. या दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासूनचे व्यापारी संबंध आहेत. अनेक व्यापारी हे रोजच्या खर्चासाठीही पाकिस्तानी रुपयाचा वापर करतात. त्याला आता पूर्णपणे बंदी असणार आहे. या दोन्ही चलनांच्या देवघेवीचा व्यवहार करणाऱ्या दलालांना देखील ५० हजार रुपयांपेक्षा जास्त पाकिस्तानी रुपये हाताळण्यास बंदी घातली गेली आहे. २०२१च्या ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आल्यापासून या दोन्ही देशांचे संबंध बिघडण्यास सुरुवात झाली आहे.
काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये सातत्याने दहशतवादी कारवाया होत आहेत. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर अमेरिकी ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ला केल्याचा आरोप केला आहे, तर तालिबानकडून पाकिस्तानमध्ये सातत्याने दहशतवादी कारवाया केल्या जात असल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जात आहे. या दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण दक्षिण आशिया टापूमधील शांतता बिघडवण्यास कारणीभूत होण्याची चिन्हे आहेत.