An assistant bank manager in Bhusawal blew ‘that’ two crores in the Tinpatti app भुसावळ : भुसावळातील बँक ऑफ इंडिया शाखेतील सहाय्यक व्यवस्थापक योगेश प्रकाश भिलाणे (रा.देवराम नगर, कमला पार्क, जळगाव) याने बँकेला तब्बल दोन कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, पोलिस कोठडीत आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याने फसवणूक करून जमा केलेली रक्कम तीनपत्ती अॅपमध्ये उडवल्याची कबुली दिली आहे. तीनपत्ती अॅपचे व्यसन लागल्याने त्यासाठी सातत्याने पैशांची गरज भासू लागल्याने त्यातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे शिवाय या प्रकरणातील आणखी काही अधिकारी, कर्मचारी अडकण्याची दाट शक्यता गुन्हे शाखेच्या सूत्रांनी ‘दैनिक तरुण भारत’शी बोलताना वर्तवली.
असे आहे नेमके प्रकरण
भुसावळातील विठ्ठल मंदिर वॉर्डात बँक ऑफ इंडियाची शाखा असून या शाखेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून योगेश प्रकाश भिलाणे हा कार्यरत होता मात्र त्यास तीनपत्ती अॅपचे व्यसन लागल्यानंतर पैसे कुठून आणावेत या विवंचनेत त्याने बँकेतील पदाचा गैरवापर करीत वापरात नसलेल्या खात्यांची माहिती स्वतःच्या लॉगीन पासवर्डद्वारे शोधली शिवाय विविध पेन्शनर यांनी आपली एफ.डी.ची रक्कम गेल्या अनेक वर्षानंतरही काढली नसल्याची बाब हेरत अशा खात्यांमधील रक्कम आपल्या पत्नीच्या बनावट नावाने उघडलेल्या खात्यात वळती केली शिवाय पेन्शनर महिला मृत झाल्यानंतर (डेड क्लेम) संबंधिताचे खाते बंद न करता या खात्यातही रक्कम वळवली. अलीकडेच बँकेचे ज्येष्ठ ठेवीदार एफ.डी.ची रक्कम घेण्यासाठी बँकेत आल्यानंतर त्यांना खाते बंद करण्यात आल्याचे व एफ.डी.विड्राल झाल्याचे सांगताच मोठा मानसिक धक्का बसला मात्र रक्कमच काढली नसल्याचा दावा ठेवीदाराने केल्यानंतर या प्रकाराचे बिंग फुटले. 11 जानेवारी 2021 ते 3 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आरोपी भिलाणे याने बँकेला दोन कोटी एक लाख 20 हजार 934 रुपयांचा चुना लावल्याचा प्रकारही स्पष्ट झाला. बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली. सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून शुक्रवार, 23 रोजी कोठडीची मुदत संपत आहे.
तीन पत्ती अॅपच्या व्यसनात उडवले दोन कोटी
आरोपी भिलाणे याचे गुन्हे शाखेच्या पथकाने वेळोवेळी चौकशी केल्यानंतर त्याचा जवाबही नोंदवला आहे. या चौकशीत त्याने आपल्याला तीनपत्ती अॅपचे व्यसन लागले व पैसे जिंकण्याच्या नादात आतापर्यंत खात्यात वळती केलेली रक्कम उडवल्याची कबुली दिली आहे. तीनपत्तीसाठी फोन पे, गुगल पे तसेच पेटीएमचा वापर करण्यात आल्याचे आरोपीने कबुल केले असून पत्नीच्या नावाने बनावट खाते तयार केल्याचीही कबुली दिली आहे.
डेड क्लेमनंतर सुरू ठेवले खाते
आरोपी भिलाणे याने पत्नीच्या बनावट नावाने खाते उघडल्यानंतर त्यात रक्कम वळवणे सुरू केले मात्र रकमेची व्याप्ती मोठी असल्याने कुणाला आर्थिक व्यवहाराचा संशय न येण्यासाठी त्याने रेल्वेच्या पेन्शन धारक बिशुनकुमार वायपेयी (भुसावळ) यांच्या खात्याचा आधार घेतला. वायपेयी यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक खात्यातील रक्कम घेण्यासाठी (डेड क्लेम) बँकेत आल्यानंतर आरोपीने खाते बंद करीत असल्याचे भासवत स्वतःच प्रकरण तयार केले मात्र मयताच्या मोबाईल क्रमांकाऐवजी त्यात स्वतःचा मोबाईल क्रमांक त्यात टाकून खाते सुरूच ठेवले. वेळोवेळी या खात्यात लाखोंची रक्कम वळती करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या अधिकाराचा दुरुपयोग त्याने या प्रकारात केल्याचे दिसून आले.
अधिकारी, कर्मचारी अडकणार : सायबर शाखेला पत्र
आरोपी भिलाणे याच्या कृत्यात आणखी काही अधिकार्यांसह कर्मचार्यांचा सहभाग असल्याचा गुन्हे शाखेला दाट संशय आहे. लवकरच या संदर्भात मोठी कारवाई होण्याची शक्यताही त्या दृष्टीने वर्तवली जात आहे. आरोपीने तीनपत्तीत उडवलेल्या पैशांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्या फोन पे, गुगल पेचा आधार घेण्यात आला त्याबाबल झालेल्या ट्रान्झेक्शनची माहिती जाणून घेण्यासाठी जळगाव सायबर सेलला गुन्हे शाखेने पत्रदेखील दिले आहे. बँक प्रशासनाने गुन्ह्याच्या चौकशीसंदर्भात अद्याप कागदपत्रेच गुन्हे शाखेला दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. तपास पोलिस उपअधीक्षक भास्कर डेरे, चंद्रकांत शिंदे करीत आहेत.