बारामती : माझं वय झालंय, नाही तर आणल्याच असत्या मुली… भर सभेत अजित पवार नको ते बोलून गेले..!

बारामती : मी सत्तेत सहभागी झाल्यानेच विकासकामे करणे शक्य होत आहे. सत्तेबाहेर असताना कामे होवू शकत नाहीत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. मी जे करतो ते कोणीही मायचा लाल करू शकत नाही, माझे चॅलेंज आहे, असेही ते म्हणाले. याच भाषणात त्यांनी एक गमतीदार किस्सा सांगून सगळ्या सभागृहातील लोकांना हसायला भाग पाडलं पण तो किस्सा सांगताना दादांचा तोल ढळला..

बारामतीत जिजाऊ भवनमध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. या भाषणात त्यांनी सरकारमध्ये जाण्यामागची भूमिका, राज्य सरकारच्या योजना, बारामतीतील विकासकामे आदी विषयांवर भाष्य केले.

किस्सा सांगताना अजित पवार यांचा तोल ढळला!

अजित पवार म्हणाले, खराडेवाडीची एक महिला मला आज भेटली. तिने पुण्यात शिक्षण संस्था सुरु केली आहे. खराडेवाडीत कॉलेज सुरु करा, अशी तिची मागणी होती. आपण सुप्याला नुकतेच कॉलेज सुरु केले आहे. खराडेवाडीसारख्या छोट्या गावात मुले कुठून मिळणार? असा सवाल तिला मी केला. तर तुम्हीच बघा असे उत्तर तिने दिले. आता माझे वय झालेय नाही तर आणलीच असती, असे पवार म्हणाल्यावर संपूर्ण सभागृहात एकच हास्यकल्लोळ माजला. मी शांत काम करायचे ठरवले आहे, चिडायचे नाही हे ठरवतोय पण काही लोक चिडायला भाग पाडतात, असंही ते म्हणाले.

अर्थमंत्री या नात्याने मी महिलांसाठी काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सदनिका खरेदीवर महिलांसाठी एक टक्का सूट दिली गेली आहे. पुरुषाच्या नावे हा व्यवहार होणार असल्यास ६ टक्के तर महिलांच्या नावे होणार असल्यास ५ टक्के कर द्यावा लागेल. ५० लाखाचे घर महिलेच्या नावे घेतले तर त्या कुटुंबाचे ५० हजार रुपये कर रुपाने वाचतील. त्यामुळे पतीराज जर नवीन घर घेणार असतील तर महिलांनीच ते घर माझ्या नावावर करा, कर कमी लागेल अशी मागणी करायला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

राज्य सरकारने मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात चौथे महिला धोरण आणले आहे. त्या अंतर्गत आता वडिलांच्या नावााआधी आईचे नाव लागणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महिला हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आईचे नाव यापुढे लागेल, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.