मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पाला होणारा स्थानिकांचा विरोध अधिक तीव्र होताना दिसत आहे. पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्या नागरिकांवर पोलिसांनी लाठिचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्याचं माध्यमांनी म्हटलं आहे. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी असं काहीही झालं नसल्याचा दावा केला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचा सामंतांना सल्ला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना फोन केला. मुख्यमंत्री सगळ्या प्रकरणाची माहिती घेत, सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जावा, असा सल्ला त्यांनी सामंत यांना दिला.
बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधातलं आंदोलन आणखी चिघळताना दिसत आहे. आंदोलकांना पोलिसांनी मारहाण केल्याचे, अश्रूधुराचा वापर केल्याचे गंभीर आरोपही होत आहेत. अशा परिस्थितीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सामोपचाराने परिस्थिती हाताळण्याचं आवाहन केलं आहे.
आंदोलनकर्त्या नागरिकांचा आरोप
बारसू रिफायनरीच्या प्रकल्पाला स्थानिकांकडून सध्या जोरदार विरोध होताना दिसत आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे माती सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. याला विरोध करत स्थानिकांनी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराचा वापर करावा लागला आहे. आपले मोबाईलही हिसकावून घेतले असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे.