MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यासोबतच देशाचे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणी निकाल देणार असून येत्या दोन दिवसात निकाल दिला जाणार आहेत.शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल आला तर पुन्हा राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे गटाने या प्रकरणात शिंदे यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली असली तरी, एकनाथ शिंदे यांनाच याप्रकरणी दिलासा मिळेल, असेच संकेत सध्या मिळत आहेत. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्त्रांकडे पाठविला असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेतील वादात शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून निवडणूक आयोगाच्या आदेशाचाही आधार घेण्यात आल्याचे समजते.
दरम्यान एकनाथ शिंदे गटाने शिवसेना एकच आहे, फक्त आम्ही शिवसेनेत नेतृत्व बदल केल्याचा दावा केला आहे आणि या मुद्द्यांचा आधारे शिंदे यांना अपात्रता प्रकरणात दिलासा मिळू शकतो, असे सूत्राकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.